ग्रामीण कामगारांना चांगल्या सुविधा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:15+5:302020-12-25T04:20:15+5:30
जयसिंगपूर : श्रमिक कामगार वर्ग हा राज्याच्या विकासामधील महत्त्वाचा घटक असून, त्यांचे आरोग्य चांगले असेल तर राज्याचे आरोग्य चांगले ...
जयसिंगपूर : श्रमिक कामगार वर्ग हा राज्याच्या विकासामधील महत्त्वाचा घटक असून, त्यांचे आरोग्य चांगले असेल तर राज्याचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळेच राज्यातील कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालयांच्या माध्यमातून महानगरांप्रमाणे ग्रामीण कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळायला हव्यात, अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्या.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालय इचलकरंजी येथे वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांबाबत सर्व श्रमिक संघाने मंत्री यड्रावकर यांची भेट घेतली होती. यावेळी इचलकरंजी येथील महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रुग्णालय स्थलांतरित न करणे, जयसिंगपूर व शिरोळ येथे नवीन सेवा दवाखाना कार्यान्वित करणे, कन्सल्टिंग स्पेशालिस्टची नियुक्ती करून अतिरिक्त रुग्णालयांशी टायअप करणे, पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करणे, यासह विविध प्रश्न मांडत यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच हे प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन मंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिले.
मंत्री यड्रावकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कोल्हापूरसह राज्यभरातील ग्रामीण कामगारांना राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत.