लॉकडाऊनमुळे खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:03+5:302021-04-10T04:23:03+5:30
कोल्हापूर : एकीकडे कडक निर्बंधामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक व्यापारी आस्थापना बंद असताना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनच्या भीतीने शुक्रवारी शहरातील बाजारपेठेत ...
कोल्हापूर : एकीकडे कडक निर्बंधामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक व्यापारी आस्थापना बंद असताना दुसरीकडे मात्र लॉकडाऊनच्या भीतीने शुक्रवारी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली. दिवसभर ही गर्दी कायम राहिली. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्याचे भान कोणालाही राहिले नाही. गर्दी होऊन संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन केला जात असताना त्याच्या पूर्वसंध्येला मात्र शहर गर्दीने ओसंडून गेले.
कोल्हापूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता शहरातील पन्नास ते साठ टक्के व्यापारी आस्थापने बंद आहेत. व्यापाऱ्यांचा अशा बंदला विरोध आहे. व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून होत आहे; परंतु त्यांची मागणी अद्यापही गांभीर्याने घेतली गेलेली नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्यापारी व दुकानदार शटर बंद करून आत व्यवसाय करत आहेत.
शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन सुरू झाला. पुढचे दोन दिवस कुठेच बाहेर पडता येणार नसल्यामुळे शहरवासीयांनी दोन दिवस लागतील एवढ्या जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू खरेदीकरिता बाजारपेठेत गर्दी केली होती. लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील गर्दी नजरेत भरणारी होती. गुढीपाडव्याचा सण मंगळवारी आहे. त्याच्या निमित्ताने देखील खरेदी झाली. विविध खाद्यपदार्थासह बेकरी पदार्थ घेण्यावर ग्राहकांचा अधिक जोर होता.
व्यापारी व दुकानदारांनी आपले व्यवहार बाहेरून बंद ठेवले होते; परंतु एखादे गिऱ्हाईक आले की, त्यांना शटर उघडून आत घेतले जात होते. चोरून व्यवसाय सुरू होते. काही हॉटेल मालकांनी देखील हाच फंडा वापरला होता. बाहेरचे दरवाजे बंद; पण आत मात्र व्यवहार सुरू होते. फक्त भांड्याची तसेच कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकाने मात्र पूर्णत: बंद होती. शहरातील मॉल बंद होते.
केएमटी, एस.टी बस वाहतूक सुरू असली तरी त्याठिकाणी शारीरिक अंतराचा नियम पाळला जात नव्हता. वडाप तसेच रिक्षा वाहतूकही सुरू होते, तेथेही नियम पाळले जात नव्हते. शुक्रवारी खासबाग मैदानाजवळील खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू होत्या. पहिले दोन- तीन दिवस त्यांनी बंद पाळला. शुक्रवारी रात्रीपासून लॉकडाऊन सुरू होणार म्हणून सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
चिरमुरे-फुटाणे
घरी बसल्यावर अनेकांना काही तरी सतत खायची सवय असते. त्यासाठी घरात चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे लागतात. संभाव्य लॉकडाऊन विचारात घेऊन चिरमुऱ्याच्या दुकानासमोरही गर्दी झाल्याचे दिसत होते.