चर्चेची घाई; पण प्रश्नांची सोडवणूक नाही
By admin | Published: October 24, 2016 12:51 AM2016-10-24T00:51:02+5:302016-10-24T00:51:02+5:30
कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा : विद्यापीठ सेवक संघाचा सातत्याने पाठपुरावा
संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत विद्यापीठ सेवक संघाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने चर्चेसाठी घाई केली; पण त्यातून ठोस निर्णय घेत प्रश्नांची सोडवणूक करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून अद्यापही झालेली नाही. संयम बाळगूनही कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
प्रलंबित मागण्यांची पूर्तता व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सेवक संघाच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या कारकिर्दीत लढा सुरू केला. डॉ. पवार यांच्या कारकिर्दीमध्ये विद्यापीठाने सुवर्णमहोत्सव साजरा केला. शिवाय विद्यापीठ ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे गेले. सुवर्ण महोत्सव आणि नॅक मूल्यांकन हे विद्यापीठाच्या प्रतिमा उंचाविण्यासह विकासासाठी महत्त्वाचे असल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला बगल देऊन संयम बाळगला. या कालावधीत पत्रांच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने संघाचा मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू राहिला. तत्कालीन कुलगुरू डॉ. पवार यांच्यासमवेत संघाच्या शिष्टमंडळाच्या चर्चेसाठी वारंवार बैठका झाल्या. पण, काहीच कार्यवाही झाली नाही. डॉ. पवार यांची कुलगुरुपदाची मुदत संपल्यानंतर एक वर्ष प्रभारी कुलगुरूंच्या कालावधीतदेखील चर्चेच्या पलीकडे पाऊल पडले नाही. वर्षभरापूर्वी डॉ. देवानंद शिंदे हे कुलगुरुपदी रुजू झाले. यानंतर नवे कुलगुरू असल्याने संघाने संयमाची भूमिका घेत त्यांच्यासमोर प्रलंबित मागण्या, प्रश्न मांडले; पण, कुलगुरू डॉ. शिंदे यांची वर्षपूर्ती आणि बीसीयूडी संचालक, वित्त व लेखाधिकारी, आस्थापना विभागातील उपकुलसचिव यांच्याशी चर्चेसाठी बैठका होऊनदेखील मागण्यांची पूर्ततेबाबत काहीच सकारात्मक कार्यवाही झाली नाही. चर्चेसाठी घाई करणाऱ्या पण, प्रत्यक्षात प्रलंबित मागण्यांची पूर्तता, प्रश्न सोडविण्यासाठी काहीच न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला कंटाळून कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून सकारात्मक आणि ठोस निर्णय होईपर्यंत लढा देण्याच्या निर्धाराने कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. ऐन परीक्षेच्या तोंडावरील हे आंदोलन विद्यापीठ प्रशासनासमोरील अडचणी वाढविणारे ठरणार आहे. (क्रमश:)
बैठकांमध्ये नुसतीच चर्चा
सेवक संघाने मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या सहा वर्षांत प्रशासनाला तीसहून अधिक पत्रे पाठविली आहेत. यातून कधी आंदोलनाचा इशारा, तर प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाला विनंती करण्यात आली होती. यावर संघाच्या शिष्टमंडळासमवेत चर्चेसाठी नोव्हेंबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीत प्रशासनासमवेत बैठका झाल्या. यानंतर कुलगुरू (दि. २२ मार्च व २१ जुलै २०१६), कुलसचिव (दि. ६ जून २०१६), बीसीयूडी संचालक (दि. १८ आॅगस्ट), वित्त व लेखाधिकारी (दि. १९ आॅगस्ट) आणि आस्थापना विभागाच्या उपकुलसचिव (दि. २० सप्टेंबर) यांच्यासमवेत बैठक झाल्या. यामध्ये मागण्या, प्रश्नांवर प्रशासनाकडून नुसतीच चर्चा झाली.