वॉशिंग्टनचा ‘अॅपल-मँगो’ बाजारात-आंबा पाहण्यासाठी गर्दी : एक हजार रुपये डझनचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:09 AM2019-05-08T01:09:41+5:302019-05-08T01:10:02+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत वॉशिंग्टन (अमेरिका) येथील अॅपल प्लस मॅँगोची आवक झाली आहे. सफरचंदासारखा दिसणारा आंबा पाहण्यासाठी समितीत मंगळवारी गर्दी झाली होती. सफरचंद व आंबा अशी दुहेरी चव असणारा हा आंबा मुंबई बाजारातून थेट
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत वॉशिंग्टन (अमेरिका) येथील अॅपल प्लस मॅँगोची आवक झाली आहे. सफरचंदासारखा दिसणारा आंबा पाहण्यासाठी समितीत मंगळवारी गर्दी झाली होती. सफरचंद व आंबा अशी दुहेरी चव असणारा हा आंबा मुंबई बाजारातून थेट कोल्हापुरात आला असून, एक हजार रुपये डझनाचा दर आहे.
कोकणासह गुजरात, कर्नाटकातील हापूस आंब्यांची आवक कोल्हापुरात दरवर्षी होते. यंदा हापूस आंब्यांची आवक चांगली आहे. अक्षयतृतीयेमुळे मंगळवारी हापूस आंब्यांबरोबरच यंदा खास वॉशिंग्टनवरून ‘अॅपल प्लस मॅँगो’ची आवक झाली आहे. वॉशिंग्टनहून मुंबई बाजारामध्ये हा आंबा आला होता. तेथून बाजार समितीतील आंबा व्यापारी नंदकुमार वळंजू यांच्या दुकानात तो मंगळवारी दाखल झाला. या आंब्याचे दहा बॉक्स आले आहेत. हा आंबा सफरचंदसारखा दिसतो; त्याचबरोबर त्याला सफरचंद व आंबा अशी दुहेरी चव आहे. हा आंबा पाहण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती.
अर्ध्या किलोचा एक आंबा या आंब्याचे वजन ४५० ते ५०० ग्रॅम आहे. त्यामुळे एका बॉक्समध्ये पाच ते सहा आंबे बसतात. हापूससारखी चव नसली तरी वेगळे खाण्यासाठी पसंतीस उतरला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी वॉशिंग्टन येथील ‘अॅपल प्लस मॅँगो’ आंब्यांची आवक झाली.