उपसा बंद पडल्याने ई वाॅर्डात पाण्यासाठी धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:01+5:302021-05-29T04:19:01+5:30
गेल्या काही महिन्यांपासून शहरात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होता. नियमित वेळेत शहरवासीयांना पाणी मिळत होते; परंतु गुरुवारी रात्री आठ वाजता ...
गेल्या काही महिन्यांपासून शहरात व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होता. नियमित वेळेत शहरवासीयांना पाणी मिळत होते; परंतु गुरुवारी रात्री आठ वाजता अचानक शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्रातील शॉर्टसर्किटमुळे तेथील फ्यूज जळाल्या. त्यामुळे शिंगणापूर येथून कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्राकडे पाणी पाठविणारी यंत्रणाच बंद पडली. ही यंत्रणा पूर्ववत करण्याकरिता काही उपकरणे पुण्याहून आणावी लागणार होती. ती दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापुरात पोहोचली. त्यानंतर पुढे तासा दोन तासात यंत्रणा पूर्ववत होऊन पाणी उपसा सुरू झाला.
पाणी उपसा सुरू झाला तरी शुद्धिकरण प्रक्रियेला पुढे तीन चार तास लागले. त्यामुळे शुक्रवारी संपूर्ण ई वाॅर्डातील कसबा बावडा, लाईनबाजार, रमणमळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कनाननगर, सदरबाजार, विचारेमाळ, कदमवाडी, भोसलेवाडी, मुक्त सैनिक वसाहत, बापट कॅम्प, रुईकर कॉलनी, कावळा नाका परिसरात पाणीपुरवठा झाला नाही.
कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्याने नेमकी माहिती कोणालाच कळत नव्हती. नागरिकांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली तेव्हा शॉर्टसर्किट होऊन यंत्रणा बंद पडल्याचे समजले. सकाळची वेळ असल्याने नागरिकांचा पाण्याचा जास्त वापर होत असतो. घरातील पाणी संपल्यामुळे अनेकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. पाणीपुरवठा विभागाने पाण्याचे टँकर दिले, पण त्यावरून पाणी पुरेशे मिळत नव्हते. ज्या-ज्या ठिकाणी कुपनलिका होत्या, त्याठिकाणी पाणी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.
फोटो क्रमांक - २८०५२०२१-कोल-वॉटर सप्लाय
ओळ - कोल्हापुरातील ई वाॅर्ड परिसरात शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही, त्यामुळे नागरिकांनी कुपनलिकांवर पाणी घेण्यासाठी गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार).