निपाणीजवळ तवंदी घाटात भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन ठार, तेरा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:02 PM2024-09-16T12:02:10+5:302024-09-16T12:03:33+5:30
निपाणी (जि. बेळगाव) : भरधाव कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची ...
निपाणी (जि. बेळगाव) : भरधाव कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निपाणी येथील तवंदी घाट येथे घडली. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल अमर येथे झाला. जखमी पट्टणकडोली, निपाणी, गडहिंग्लज, हुबळी, सातारा येथील रहिवासी आहेत.
या अपघातात जबीन महंमदहुसेन मकानदार (वय ५८ रा. निपाणी) व शिक्षक संतोष गणपती माने (वय ५०, रा. खडकलाट) हे जागीच ठार झाले, तर दिलदार मुल्ला व रेखा गाडीवड्डर गंभीर जखमी असल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
जितेंद्र मोहिते हा हुबळी येथून कराडकडे मालवाहतूक ट्रकने जात होता. हॉटेल व्हाइट हाऊस नजीक आला असता, चालक जितेंद्र याचा ट्रकवरील ताबा सुटला. याच वेळी संतोष माने हे रेखा गाडीवड्डर यांना संकेश्वरकडे दूचाकीवरून घेऊन जात होते. याचवेळी ट्रकने विरोधी बाजूला येऊन माने यांच्या दुचाकीला धडक दिली. यामधे माने यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा ट्रकने कंटेनर, आयशर या दोन वाहनांना धडक दिली. त्याचबरोबर पट्टणकोडोलीच्या दिशेने जाणाऱ्या कारवर ट्रक आढळला.
यामध्ये कारमधील जबीन मकानदार यांचा जागीच मृत्यू झाला तर दिलदार मुल्ला, परविन मुल्ला व नुसरा मुल्ला, साफिया मुुल्ला हे चौघे जखमी झाले. दरम्यान, याच ट्रकने हुबळीतून साताराकडे जाणाऱ्या कारलाही जोराची धडक दिली. यामध्ये मंजुनाथ तेंडुलकर, सुपर्णा नेगलुर व श्रेया नेगलुर हे जखमी झाले. ट्रकने धडक दिलेल्या आयशर व कंटेनरमधील चालक जखमी झाले. या अपघातानंतर बेळगाव कोल्हापूरकडे होणारी वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली होती.