उन्हाच्या तडाख्यामुळे नदी, विहीर, तलावात पोहण्यासाठी गर्दी; निष्काळजीपणा येतोय अनेकांच्या जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:45 PM2024-05-09T13:45:37+5:302024-05-09T13:47:17+5:30
पोहायला जाताना 'या' गोष्टीची काळजी घ्या
सचिन यादव
कोल्हापूर : उन्हाळ्याच्या सुटीत पोहायला शिकण्यासह मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने नदी, विहीर, तलाव आणि बंधाऱ्यांवर पोहायला जाणाऱ्या आबालवृद्धांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक घटनांत पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने लहान मुलांसह तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणिक निष्काळजी अनेकांच्या जिवावर बेतली. त्यामुळे पोहायला जाताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.
सध्या शाळा आणि कॉलेजला मे महिन्याची सुटी आहे. त्यासह पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अनेकांनी पोहण्यासाठी पसंती दिली आहे. सुटीत लहान मुलांचा पाहुण्यांच्या गावी दौरा असतो. त्या ठिकाणी परिसरातील नदी, विहीर, तलावात पोहण्यासाठी गर्दीचे चित्र आहे. मात्र, पोहताना निष्काळजीपणा घेतल्याने अनेकांच्या जिवावर बेतले आहे.
काय काळजी घ्याल
- धोकादायक ठिकाणी पोहायला जाणे टाळा.
- सुरक्षा साधने बरोबर ठेवा.
- पोहता येणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमवेत राहावे.
- प्रथमोपचाराचे ज्ञान असल्यास अधिक चांगले.
- पाण्याच्या खोलीचा अंदाज घ्या
- स्विमिंगचे कीट द्या
पंचगंगेत पोहताना जरा जपूनच
पंचगंगा नदीचे पात्र काही ठिकाणी संथ, तर काही ठिकाणी वेगात वाहणारे आहे. काही भागांत नदीपात्रात दिसून न येणाऱ्या झाडांच्या बुंध्यामुळे किंवा खडकांमुळे पाण्याचे भोवरे निर्माण होऊ शकतात. या भोवऱ्यात पट्टीचा पोहणारा गेला, तरी त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी नदीपात्रात खड्डे असल्याने तेथे बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात जाताना जरा काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
तलावात प्रशिक्षक
जलतरण तलावात प्रशिक्षक उपलब्ध आहेत. पोहायला शिकणाऱ्यांची या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून काळजी घेतली जाते. पोहताना काही धोका होऊ नये, यासाठी नवशिक्या मुलांच्या पाठीवर फायबरचे ड्रम बांधले जातात. तलावावर पोहणारी मंडळी रबरी ट्यूब, पॅकबंद पत्र्याचे डबे वापरतात. अधिक गर्दीच्या ठिकाणी प्रशिक्षक आणि जीवरक्षक आहेत.
जलतरण तलावात पोहणे वेगळे आहे. मात्र नदी, तलाव, धरणे, विहिरीत पोहणे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी पोहायला जाताना जलतरण साक्षरता महत्त्वाची आहे. - नितीन पाटील, पालक
पोहताना कोणताही अतिआत्मविश्वास नसावा. अनेक ठिकाणी पाण्याची खोली आणि अडथळे असतात. त्याचा अंदाज घेतला पाहिजे. समुपदेशन, मार्गदर्शन, शिक्षण आणि प्रशिक्षण गरजेचे आहे. - मानसिंग पाटील, प्रशिक्षक