Kolhapur- रशियन डीजे चालते मग गौतमी का नको, परवानगी नाकारल्याने मंडळांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 01:10 PM2023-09-21T13:10:13+5:302023-09-21T13:11:02+5:30
कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) आणि राशिवडे (ता. राधानगरी) येथील गणेश मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले ...
कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) आणि राशिवडे (ता. राधानगरी) येथील गणेश मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत दिली.
गणेशोत्सवानिमित्त नंदगाव आणि राशिवडे येथील मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यासाठी इस्पुर्ली आणि राधानगरी पोलिसांकडे परवानगी अर्ज दिले होते. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गणेशोत्सव काळात होणाऱ्या तिच्या कार्यक्रमाला पुरेसा पोलिस बंदोबस्त देणे शक्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच जिल्ह्यातील डान्स असोसिएशननेही गौतमीचे कार्यक्रम जिल्ह्यात होऊ नयेत, असा ठराव केला आहे. त्यामुळे तिच्या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
मंडळांचा सवाल
कलेची देवता असलेल्या गणेशाच्या उत्सवात पारंपरिक कलांचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना अटकाव करणे योग्य नाही. रशियन डीजेला पोलिस परवानगी देतात, मग गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला काय अडचण आहे, असा सवाल मंडळांनी उपस्थित केला. सोशल मीडियातही यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.