रशियन, जर्मन, जपानी संस्कृतीचे शिवाजी विद्यापीठात घडले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:44 AM2020-02-25T11:44:44+5:302020-02-25T11:46:47+5:30
रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगाल संस्कृतीचे दर्शन शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित ‘कार्निव्हल’ या कला, सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी घडले. ‘कार्निव्हल’ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
कोल्हापूर : रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगाल संस्कृतीचे दर्शन शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित ‘कार्निव्हल’ या कला, सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी घडले. ‘कार्निव्हल’ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये या कार्निव्हलचे उद्घाटन चित्रकार संपत नायकवाडी यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे, स्नेहा वझे, स्नेहल शेटे, शीतल कुलकर्णी, प्रियांका माळकर, ऐश्वर्या चव्हाण, आदी उपस्थित होते.
या उद्घाटनापूर्वी झालेल्या ओरिगामी कार्यशाळेमध्ये चित्रकार अर्चना देसाई यांनी ओरिगामी प्रात्यक्षिके सादर केली. लीलीची फुले, गांधी टोपी, बाऊल, आदी विविध कागदी कलावस्तू बनविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी रशियन, जपानी, जर्मन, पोर्तुगीज संस्कृतीशी संबंधित कलावस्तू, ओरिगामी कार्यशाळेत निर्मिती केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडले. त्यात जपानची बुलेट ट्रेनची प्रतिकृती, जपानी चित्रे, जर्मनीचे बी.एम.डब्ल्यू, फोक्स व्हॅगन कंपन्यांच्या मोटारींची मॉडेल्स, फुटबॉल, हाम्बुर्ग व बर्लिन शहरांची माहिती, पोतुर्गालमधील सिरॅमिक प्लेटस् व पोर्सिलीन वस्तू, की चेन, फ्रीज मॅग्नेट, स्कार्फ, रशियन संस्कृतीतील समवार (चहाची किटली, भांडे), मत्र्योशका (लाकडी बाहुली), ग्झहेल सिरॅमिक (लाकडी वस्तू), इकोम (फोटो फे्रम), जुनी नाणी, सणांची माहिती देणारे जुने कॅलेंडर, त्सार टोपी, रशियन रंगचित्रे, साकुरा फुले आणि माउंट फुजीची कलाकृती, शिबोरी प्रकारातील विविध पर्यावरणस्नेही वस्तू, आदींचा समावेश होता.
‘ओरिगामी’तून तयार केलेल्या कागदी फुले, फ्रेम लावलेल्या आणि शिन्चेन व जपानी छत्री-पंखा असलेल्या ‘सेल्फी पाँईट’वर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सेल्फी टिपून घेतल्या. सायंकाळी ‘वजदा’ हा अरेबिक चित्रपट दाखविण्यात आला.
संस्कृतींना जोडणारा दुवा
विदेशी भाषा, कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारा हा उत्सव विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. त्यातून दूरदेशीच्या कलानिर्मिती प्रक्रियेच्या आनंदाची प्रचिती येते, असे नायकवाडी यांनी सांगितले. परदेशी संस्कृतीचा भाग असणाऱ्या या पारंपरिक विविधरंगी कलावस्तू प्रेक्षकांना एक व्यापक व समावेशक दृष्टी देतात. लोकांच्या जीवनात रंग भरतात, असे मत डॉ. मेघा पानसरे यांनी व्यक्त केले.
विविध चार भाषा आणि त्यांच्या प्रांतांच्या संस्कृतीची एकत्रित माहिती या ‘कार्निव्हल’मध्ये मिळाली. त्यामुळे या भाषांबाबत आवड निर्माण झाली. नावीन्यपूर्ण संकल्पना विदेशी भाषा विभागाने राबविली आहे.
- कोमल गुंदेशा,
विद्यार्थिनी