दिव्यांगांच्या तीनचाकी सायकलांना चढतोय गंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:22+5:302021-06-04T04:18:22+5:30
कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्याकरिता दिलेल्या सुमारे दोनशे व्हीलचेअर व तीनचाकी सायकल या शेंडा पार्क येथील ...
कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्याकरिता दिलेल्या सुमारे दोनशे व्हीलचेअर व तीनचाकी सायकल या शेंडा पार्क येथील चेतना दिव्यांग विकास संस्थेच्या आवारात अक्षरश; गंजत पडल्याची बाब गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या राजारामपुरी मंडलतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
केंद्र सरकारच्यावतीने सामाजिक न्यायमंत्री रामदार आठवले व सामाजिक न्याय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी कोल्हापुरातील दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्याकरिता दोनशेहून अधिक व्हीलचेअर व तीनचाकी सायकल घेऊन दिल्या होत्या; परंतु या तीनचाकी सायकल व व्हीलचेअर ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्या शेंडा पार्क येथील चेतना संस्थेच्या खुल्या जागेवर ठेवल्या आहेत. या साहित्याचे योग्य वेळेत वितरण न केल्यामुळे त्यांच्या टायर्स व कोचिंग खराब होत आले आहे. उघड्यावरच असल्याने त्याना गंजही लागला आहे.
भाजपच्या राजारामपुरी मंडलच्या शिष्टमंडळाने गुरुवारी दुपारी प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. या साहित्याची नासाडी होण्याआधी याेग्य व्यक्तींना वाटप करावे, तसेच कोल्हापुरातील दिव्यांग व्यक्तींना न्याय देऊन मोदी सरकार व सामाजिक न्याय मंत्रालयाच्या संकल्पनेला साथ द्यावी; अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
शिष्टमंडळात मंडल अध्यक्ष रवींद्र मुतगी, महानगर चिटणीस सुनीलसिंह चव्हाण, दिलीप मैत्राणी, बापू राणे, देवदास औताडे, रहिम सनदी, अभिजित शिंदे, संतोष कदम, नितीन देसाई, मानसिंग पाटील, महादेव बिरांजे, योगेश साळोखे यांचा समावेश होता.
वाटपाचे नियोजन करतोय - आडसूळ
याबाबत महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे विचारणा केली असता, गेल्या वर्षी जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी साहित्य आले. महानगरपालिका हद्दीतील, तसेच जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील दिव्यांगांचेही साहित्य आहे. आपापल्या याद्या देऊन साहित्य ताब्यात घ्या, अशा सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु कोणी नेले नाही. महापालिकेच्या वाटणीचे साहित्य तत्काळ ताब्यात घेऊन त्याचे वाटप करण्यात येईल. ग्रामीण भागातील वाटपाच्या सूचनाही संबंधितांना देण्यात येतील.