रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 03:30 AM2019-10-21T03:30:23+5:302019-10-21T06:06:35+5:30
रुस्तम-ए-हिंद, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षाचे होते.
कोल्हापूर : रुस्तम-ए-हिंद, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षाचे होते. महाराष्ट्रच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पार्थिवावर सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा हिंदकेसरी विनोद, अमोल, विवाहित मुलगी सुहानी, सुरेखा आणि सहा नातवंडे असा परिवार आहे.
कुस्तीक्षेत्रामध्ये ‘दादूमामा’ या नावाने ते परिचित होते. लहान वयापासूनच कुस्तीमध्ये नाव कमाविलेल्या चौगुले यांनी १९७३ मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. १९७० आणि ७१ मध्ये सलग दोनदा ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला. याच दरम्यान दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी नेत्रपाल सिंगवर मात करून ‘ रुस्तम -ए-हिंद’ हा किताब पटकावीत देशभर आपली कीर्ती पसरवली.
दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या स्पर्धेत मुरालील याला अस्मान दाखवून ‘महान भारत केसरी’चा किताब त्यांनी पटकावला होता. त्यांनी अनेक नवोदित मल्ल घडविले. ते सध्या कोल्हापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विद्यमान अध्यक्ष व पुण्यातील राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
शाहू छत्रपती, राष्ट्रीय तालीम संघाचे मुख्य विश्वस्त बाळ गायकवाड, हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यासह कुस्तीक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
सातव्या वर्षी कुस्तीचा श्रीगणेशा
वयाच्या सातव्या वर्षामध्ये कुस्तीचा श्रीगणेशा करणाऱ्या दादूमामांनी वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत प्रवेश घेतला. वस्ताद बाबू बिरे व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पठ्ठ्या तयार झाला. उत्तरेतील बडे मल्ल सादिक पंजाबी, सतपाल यासारख्या नामवंत मल्लांबरोबर लढलेल्या कुस्त्या लोकांच्या आजही स्मरणात आहेत. दादूमामांनी आपल्या अमोल व विनोद या दोन मुलांनाही चांगले पैलवान बनविले. मोठा मुलगा विनोद चौगुले याने ‘महाराष्ट्र केसरी’ व ‘हिंद केसरी’ होण्याचा मान मिळविला.