लाचखोर फौजदार जाळ्यात
By admin | Published: April 26, 2017 01:06 AM2017-04-26T01:06:44+5:302017-04-26T01:06:44+5:30
‘लाचलुचपत’ची कारवाई; २.४० लाखांची लाच स्वीकारली
आजरा : आजरा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक जे. डी. ऊर्फ जनार्दन दगडू जाधव यांना दोन लाख चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, संदीप बाळासाहेब पाटील (रा. मडिलगे, ता. आजरा) यांना गावाशेजारी बीअर बार सुरू करावयाचा होता. यासाठी परवान्याबाबत त्यांनी जाधव यांची भेट घेतली. बार परवान्यासंदर्भातील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. तुम्हाला बीअर बारचे लायसन्स् मिळवून देतो परंतु त्यासाठी अधिकाऱ्यांना २ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पाटील यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या चेकने दोन लाख रुपये दिले.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गावरील बीअरबार दुकान बंद करावे, असा आदेश दिल्याने पाटील यांनी जाधव यांना भेटून बीअरबार परवाना मला नको व दिलेले पैसे परत द्या, अशी मागणी केली. त्यावेळी जाधव यांनी तू दिलेल्या पैशाच्या दुप्पट खर्च झाला आहे. माझे वर खर्च झालेले आणखी अडीच लाख रुपये मला दे, असा तगादा पाटील यांच्याकडे लावला. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटील यांनी तक्रार नोंदविली.
पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पंच व साक्षीदारांसमक्ष पंचायत समिती कार्यालयासमोर ४० हजार रुपये रोख व २ लाख रकमेचा चेक स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलिस उपअधीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक, सहा. फौजदार शाम बुचडे, मनोज खोत, मोहन सौंंदत्ती, संदीप पावलेकर या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
पोलिस खाते हादरले
पोलिस खात्यामध्ये बेकायदेशीररीत्या पैसे कमावणे हे नवीन नसले तरी या कारवाईत तब्बल साडेचार लाख रुपये इतकी रक्कम पुढे येत असल्याने कारवाईने पोलिस दलात खळबळ माजली आहे.
कारवाईची मालिका सुरूच : भूमी अभिलेख लिपिक, अभियंता, आजरा तालुक्यातील तलाठी, तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक अशा बड्या मंडळींपासून ते छोट्या-छोट्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची मालिका सुरूच असल्याचे मंगळवारच्या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.