सौंदत्ती यात्रेसाठी एस. टी. भाडे व खोळंबा आकारात सवलत द्या : राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:43 AM2019-11-16T11:43:52+5:302019-11-16T11:47:09+5:30
श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित देवोल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोल्हापूर : श्री रेणुका देवीच्या सौंदत्ती यात्रेसाठी गतवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. भाडे व खोळंबा आकारात विशेष सवलत द्यावी, अशी मागणी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी केली. त्यांनी मुंबईत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित देवोल यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, यंदा रेणुका भक्त संघटनांनी कर्नाटक एस. टी.ला विरोध करून, महाराष्ट्र एस. टी. प्रासंगिक कराराद्वारे घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने डिसेंबरमधील सौंदत्ती यात्रेला भाविकांची पसंती एस. टी. बसेसना असणार आहे. यात्रेसाठी शहरातून १६५ एस. टी. गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात.
गतवर्षी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महामंडळाच्या वतीने गतवर्षी सौंदत्ती यात्रेकरिता ३८० कि. मी. करिता प्रतिकिलोमीटर ५० वरून ३४ रुपये करण्यात आला होता. त्याचबरोबर ताशी ९८ रुपयेप्रमाणे ७२ तासांचा खोळंबा आकार १० करण्यात आला होता; त्यामुळे भाविकांची ३३ लाख ६९ हजार ९६० रुपयांची बचत झाली.
यंदादेखील याचप्रमाणे विशेष सवलत देण्यात यावी, असे क्षीरसागर यांनी सांगितले. यावर देवोल यांनी याबाबत एस. टी. महामंडळ सकारात्मक असून, येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन संबंधितांना सूचना देऊ, अशी ग्वाही दिली.