दिवाळीचा हंगाम कॅश करण्यासाठी एस. टी. सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 04:40 PM2020-11-04T16:40:19+5:302020-11-04T16:43:00+5:30
satetransport, diwali, kolhapurnews लॉकडाऊनमुळे आर्थिक खाईत लोटलेल्या एस. टी.च्या सर्व आशा आता दिवाळी हंगामावर आहेत. ११ ते २२ नोव्हेंबर हा गर्दीचा आणि हमखास पैसे मिळवून देणारा हंगाम कॅश करण्यासाठी एस.टी पूर्ण ताकदीने पुढे सरसावली आहे. आगारनिहाय जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.
कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे आर्थिक खाईत लोटलेल्या एस. टी.च्या सर्व आशा आता दिवाळी हंगामावर आहेत. ११ ते २२ नोव्हेंबर हा गर्दीचा आणि हमखास पैसे मिळवून देणारा हंगाम कॅश करण्यासाठी एस.टी पूर्ण ताकदीने पुढे सरसावली आहे. आगारनिहाय जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबई, पुण्यातून कोल्हापुरात आणण्यासाठी २२० जादा गाड्यांची सोय करून दिली आहे, तर कोल्हापुरातून बाहेर जाणाऱ्यांसाठी अतिरिक्त १० गाड्या दिमतीला ठेवण्यात आल्या आहेत. गर्दी पाहून आणखी फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एस. टी. ला बसला आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा विचार केला तर अजूनही निम्म्या गाड्या डेपोत थांबून तर निम्म्याच रस्त्यावर धावत आहेत. दिवाळी हा एस.टी.साठी कायमच भरघोस उत्पन्न मिळवून देणारा सण ठरतो. दरवर्षी हंगामी दरवाढीसह जादा गाड्यांचे नियोजन केले जाते, पण यावर्षी हंगामी वाढ न करता दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एकदा एस.टी.कडे आणण्याचे धोरण ठेवण्यात आले आहे.
एकट्या कोल्हापूर विभागाने मुंबईतून येणाऱ्यांसाठी २० जादा गाड्या सोडल्या आहेत, तर पुण्यातून कोल्हापूरकडे येण्यासाठी २०० गाड्यांची सोय केली आहे. कोल्हापुरात खासगी वाहनाने आल्यानंतर बेळगाव, गोवा, कोकणासह जिल्ह्यातील मोठ्या शहरांकडे जाण्यासाठीही १० विशेष गाड्यांची सोय केली आहे.
कोणत्याही दरवाढीशिवाय आणि सुरक्षित प्रवास म्हणून एस.टीचा लौकीक आहे. आजवर एस.टीने एक प्रवासी असतानाही त्याला सुरक्षित पोहोचविण्याची सामाजिक बांधीलकी जपली, आता एस. टी. ला गरज असल्याने जास्तीत जास्त प्रवाशांनी एस. टी. ने प्रवास करून महाराष्ट्राच्या या जीवनदायिनीला गतवैभव मिळवून देण्याची गरज आहे.
- मुंबईतून येण्याासाठी : ११ ते २२ नोव्हेंबर
- पुण्यातून येण्यासाठी : ११ ते १३ नोव्हेंबर
- कोल्हापुरातून जाण्यासाठी : ११ ते १४ नोव्हेबर
सध्या कोल्हापुरातील १२ आगारांत ४०० एस. टी. गाड्या रस्त्यावर धावत आहेत.
कोरोनाच्या काळात पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाली असली तरी खबरदारी म्हणून सॅनिटायझरचा वापर, नो मास्क नो एन्ट्री हे धोरण कायम आहे. एस. टी. तही त्याचे तंतोतत पालन होते. सुरक्षित प्रवास म्हणून एस.टीची निवड करावी.
अतुल मोरे,
सहाय्यक वाहतूक अधिकारी , कोल्हापूर विभाग