जिल्ह्यात एस. टी.ला वाढता, तर रेल्वेला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:45+5:302021-06-10T04:16:45+5:30

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या पाहून राज्य शासनाने सोमवार (दि. ७)पासून काहीअंशी सूट दिली आहे. त्यानंतर एस. टी. बस ...

S. in the district. Increasing to T, but less response to Railways | जिल्ह्यात एस. टी.ला वाढता, तर रेल्वेला अल्प प्रतिसाद

जिल्ह्यात एस. टी.ला वाढता, तर रेल्वेला अल्प प्रतिसाद

Next

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या पाहून राज्य शासनाने सोमवार (दि. ७)पासून काहीअंशी सूट दिली आहे. त्यानंतर एस. टी. बस आणि रेल्वे सेवा काहीअंशी पूर्वपदावार येऊ लागली आहे. एस. टी.च्या पुणे मार्गावर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, अन्य मार्गांवर अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. तर केवळ दोनच रेल्वे सुरु असल्यामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असून, या रेल्वेगाड्या कोल्हापूर स्थानकातून रिकाम्याच धावत आहेत.

एस. टी. महामंडळाने गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर ते पुणे, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग यासह जिल्ह्यांतर्गत सेवा सुरु केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २००हून अधिक फेऱ्या दिवसभरात होत आहेत. त्यातून किमान दहा हजार प्रवासी प्रवास करत आहेत. सर्वाधिक फेऱ्यांची मागणी स्थानिकसह पुणे मार्गावर आहे. तर त्याखालोखाल सांगली, सातारा, आदी मार्गावर जाण्यासाठी प्रवासी उत्सुक आहेत. कोल्हापुरातून खासगीसह एस. टी. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यापूर्वी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मात्र, कोरोनाच्या सलग दुसऱ्या कहरामुळे उरलेसुरले प्रवासीही रेल्वेला थंडा प्रतिसाद देत आहेत. याशिवाय मध्य रेल्वेने कोल्हापुरातून सुटणाऱ्या सह्याद्री, महालक्ष्मी, पुणे, मिरज पॅसेंजर आदी १६ रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत. केवळ मुंबई स्पेशल (कोयना एक्सप्रेस), हरिप्रिया (तिरुपती एक्सप्रेस) आणि आठवड्यातून एक दिवस धावणारी कोल्हापूर ते धनबाद अशा तीनच रेल्वे सुरु आहेत. यात धनबादला कोल्हापुरातून जाणाऱ्या परराज्यातील कामगारांची संख्या अधिक आहे तर कोल्हापुरातून मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. यात रेल्वेच्या वेळापत्रकानुसार प्रतिसाद अल्प मिळत आहे. त्यात कोरोनाच्या भीतीमुळे रेल्वे प्रवासाला प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.

‘धनबाद’ला जाणाऱ्या रेल्वेला गर्दी

कोल्हापूर ते धनबाद या विशेष रेल्वेला कोल्हापुरातून प्रतिसाद अधिक आहे. आठवड्यातून एक दिवस ही रेल्वे बुधवारी धावते. त्यामुळे या रेल्वेगाडीला मोठा प्रतिसाद आहे. जिल्ह्यात बांधकाम, बिगारी, मोठमोठ्या सुतगिरण्या, फौंड्री आदींमध्ये परराज्यातील कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करतात. त्यामुळे या परराज्यातील प्रवाशांची कोल्हापूर-धनबाद या विशेष रेल्वेला अधिक पसंती आहे.

एस. टी.च्या पुणे मार्गावर अधिक गर्दी

पुण्यातील आयटी, ॲनिमेशन, ग्राफिक डिझाईन, विविध मोटार कंपन्यांमध्ये अभियंता असलेल्या कोल्हापूरकरांची संख्या अधिक आहे. या अभियंत्यांना कोरोना सोडून इतर काळात पाच दिवसांचा आठवडा असल्यामुळे दोन दिवस कोल्हापूरला राहता येते. त्याकरिता ही मंडळी शुक्रवारी रात्री कोल्हापुरात दाखल होत असत आणि सोमवारी पहाटेच्या बसने पुन्हा पुण्याला पोहोचत असत. कोरोनानंतर आता पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकासह विविध आगारांतून पुणे मार्गावर सर्वाधिक बसेसना मागणी आहे.

बसेसच्या फेऱ्या - २००

धावणाऱ्या रेल्वेंची संख्या : ३

रेल्वे प्रवासी संख्या - ४५०

रोज एस. टी. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या - १०,६३०

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

प्रतिक्रिया

सॅनिटायझरसह मास्कचा वापर केल्यामुळे एस. टी.चा प्रवास सुखकर आहे. याशिवाय ५० टक्के क्षमतेने या बसेस धावत असून, ही बाब सोईस्कर आहे.

- रमेश महाजन, एस. टी. प्रवासी,

प्रतिक्रिया

एका सीटवर एकच प्रवासी बसत असल्यामुळे चांगला प्रवास होत आहे. असा सुखकर प्रवास अन्य वाहनातून शक्य नाही.

- अनुजा मगर, एस. टी. प्रवासी

प्रतिक्रिया

कोरोनामुळे रेल्वेनेही कोल्हापूर - मिरज पॅसेंजर सेवा बंद केली आहे. त्यामुळे इच्छा असूनही प्रवास करता येत नाही.

राजा कणकर, रेल्वे प्रवासी

प्रतिक्रिया

रेल्वेचा प्रवास सुखकर आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात रेल्वे नसल्यामुळे खासगी वाहनाचा वापर करत आहे. ही सेवा लवकर सुरु व्हावी.

राम कारंडे, रेल्वे प्रवासी

कोट

कोरोना संसर्गामुळे सद्यस्थितीत केवळ कोयना, हरिप्रिया आणि धनबाद अशा तीन रेल्वेच सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांचीही संख्या कमी आहे.

- ए . आय. फर्नांडीस, स्थानक प्रबंधक, कोल्हापूर रेल्वे स्थानक

कोट

कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होऊ लागल्यामुळे एस. टी. बसेसना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये बस सॅनिटाईझ करण्यासह प्रवाशांना मास्क सक्तीचा आहे. सर्व नियम पाळून बसेस मार्गस्थ केल्या जातात.

शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी , एस. टी. महामंडळ, कोल्हापूर

Web Title: S. in the district. Increasing to T, but less response to Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.