शासनाकडून एस. टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय : संदीप शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:53+5:302021-09-03T04:24:53+5:30
शिरोळ : एस. टी. कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून काम केले आहे. ३०४ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; परंतु एस. ...
शिरोळ : एस. टी. कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून काम केले आहे. ३०४ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; परंतु एस. टी. कर्मचारी हा पगारासाठी हवालदिल झाला आहे. कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने सतत अन्याय केला आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांचे पालकत्व स्वीकारून एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे; अन्यथा आगामी काळात मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी शिरोळ येथे पत्रकार परिषदेत दिला.
कुरुंदवाड एस. टी. आगाराला गुरुवारी राज्याध्यक्ष शिंदे यांनी भेट दिली. त्यानंतर जिल्ह्यातील विभागीय बैठक घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, महापुराच्या काळात कुरुंदवाड आगाराचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी एस. टी.चे नुकसान होऊ दिले नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. कर्मचाऱ्यांना वेतन नसल्यामुळे पगारासाठी भीक मागावी लागत आहे. ‘शिवशाही’सारख्या बसेस सुरू करून ईस्ट इंडिया कंपनी होऊ द्यायची नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतनही शासनाने लागू केलेला नाही. त्यामुळे एस. टी.ला वाचविण्यासाठी येणाऱ्या काळात व्यापक लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी युनियनचे सचिव शिवाजीराव देशमुख, शीला नाईकवडे, जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, वसंत पाटील, निनाद भोसले, रवींद्र भोसले, अरुणा पाटील, मनीषा मुळुक, अश्विनी धमाल, आशपाक नालबंद, गणेश शेडबाळे, अरुण वास्कर, चंद्रकांत पवार, रामचंद्र गोसावी, संतोष जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - ०२०९२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथे एस. टी. महामंडळाचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.