एस. टी.चे शासनात विलिनीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:59 PM2020-12-25T17:59:17+5:302020-12-25T18:00:54+5:30
state transport Kolhapurnews-कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.
कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून या महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. विलिनीकरणाचा प्रयोग इतर राज्यात यशस्वी झाला असून, आपल्या राज्यात तो होण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न करावेत.
एस. टी.तील काही काँग्रेसच्या संघटना स्वार्थासाठी सरकार विरोधात असंतोष पसरवत आहेत. त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करण्याची मागणी बरगे यांनी केली. एस. टी.ला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बी. डी. शिंदे, राजेंद्र पाटील, मियालाल पटवेगार, हिंदुराव कुंभार, संजय कांबळे, ए. बी. माने, संजय पोवार-वाईकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव थोरात, ए. आर. पाटील, परवीन पठाण, बी. आर. साळोखे, सुनील फल्ले, एस. वाय. पोवार, अय्याज चौगुले, ए. ए. गवंडी, अनिता पाटील, वैशाली पिंगळे, गजानन विचारे आदी उपस्थित होते. संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी प्रास्तविक केले. रावण समुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. संजय सासने यांनी आभार मानले.
श्रीरंग बरगे म्हणाले की, महामंडळाचा संचित तोटा सध्या साडेसहा हजार कोटी आहे. महामंडळ उर्जितावस्थेत आणण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील आणि महामंडळाचे एमडी. शेखर चन्ने यांचे नियोजनबद्ध काम असून, मंत्री पाटील व एमडी चन्ने यांना विभागीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.