एस. टी.ला पुणे मार्गावर सर्वाधिक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:06+5:302021-06-09T04:31:06+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने लाॅकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात हटवल्यानंतर एस. टी.च्या कोल्हापूर विभागाने सोमवारपासून मुंबई, पुणे, सोलापूर ,सांगली व ...
कोल्हापूर : राज्य शासनाने लाॅकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात हटवल्यानंतर एस. टी.च्या कोल्हापूर विभागाने सोमवारपासून मुंबई, पुणे, सोलापूर ,सांगली व स्थानिक गावांमध्ये सेवा सुरु केली. त्यात प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद पुणे मार्गावर तर उर्वरित मार्गांवर प्रवाशांचा नियमित प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ६०हून अधिक बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या.
सर्वसामान्यांना माफक दरात व सुरक्षित प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या बसेसचा मोठा आधार आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा नव्हती. राज्य शासनाने लाॅकडाऊनचे निर्बंध काहीअंशी शिथील केल्यानंतर एस. टी.ला प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून परवानगी दिली. त्यामुळे महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला दिवसभरात सर्वाधिक पुणे आणि त्याखालोखाल मुंबई, सांगली व जिल्हांतर्गत बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोलापूर मार्गावरील बसला अल्प प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे वाहकांकडून प्रवासापूर्वी प्रवाशांचे नाव, मोबाईल क्रमांक लिहून घेतला जात होता. मास्क आणि सॅनिटायझर सक्तीचे केले होते. या सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच बस मार्गस्थ केली जात होती.
फोटो :०७०६२०२१-कोल-एस. टी. पुणे
ओळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारपासून एस. टी.च्या प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली. पुणे मार्गावरील बस सुटण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांची नावासह नोंद केली.
(छाया : आदित्य वेल्हाळ)