एस. रवितेजा, अभिषेक, राजेशची घोडदौड कायम
By admin | Published: May 10, 2017 11:16 PM2017-05-10T23:16:16+5:302017-05-10T23:19:50+5:30
बाबूकाका शिरगावकर खुल्या बुद्धिबळ स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : सांगली बुद्धिबळ महोत्सवातील बाबूकाका शिरगावकर फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीअखेर भारतीय रेल्वेचा एस. रवितेजा, पुण्याचा अभिषेक केळकर व तमिळनाडूचा व्हीएव्ही राजेश यांनी सहा गुणांसह आपली घोडदौड कायम ठेवली. सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरमध्ये या स्पर्धा सुरू आहेत. नूतन बुद्धिबळ मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पुण्याचा निखिल दीक्षित विरुद्ध मुंबईचा राकेश कुलकर्णी यांच्यातील डाव ५१ व्या चालीला बरोबरीत सुटला. पुण्याच्या अभिषेक केळकरने रेल्वेच्या अमरदीप बारटक्केला ५६ व्या चालीला नमवले. अहमदनगरच्या सुयोग वाघने संकल्प शेळकेचा ५० व्या चालीला पराभव केला.
समीर कठमाळेने पुण्याच्या आकाश दळवीला पराभूत केले. रेल्वेचा एस. रवितेजा व तमिळनाडूचा व्हीएनव्ही राजेशन यांच्यातील डाव २३ व्या चालीस बरोबरीत सुटला. समीर कठमाळे, ओंकार कडव, सौरभ खर्डेकर यांच्यासह बारा खेळाडू पाच गुणांसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत.
सांगली बुद्धिबळ महोत्सवातील बाबूकाका शिरगावकर फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी अभिषेक केळकर (पुणे) व अमरदीप बारटक्के (मुंबई) यांच्यातील डाव रंगला.