एस. टी. गँगवर ‘मोक्का’ची कारवाई

By admin | Published: June 19, 2016 01:18 AM2016-06-19T01:18:20+5:302016-06-19T01:18:20+5:30

अमृत देशमुख यांची माहिती : स्वप्निल तहसीलदारसह १२ जणांचा समावेश; २५ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

S. T. Action of 'Mookka' on gang | एस. टी. गँगवर ‘मोक्का’ची कारवाई

एस. टी. गँगवर ‘मोक्का’ची कारवाई

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात २५ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या स्वप्निल तहसीलदार (एस. टी.) या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीचा म्होरक्या स्वप्निल संजय तहसीलदारवर एकूण १३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, क्रिकेट बेटिंग यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत देशमुख म्हणाले, कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्ये गुुंड स्वप्निल तहसीलदार टोळीवर आजपर्यंत २५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, गर्दी व मारामारी, सरकारी नोकरावर हल्ला, चोरी, मादक पदार्थ जवळ बाळगणे आणि क्रिकेट बेटिंगसारखे गुन्हे नोंद आहेत. तसेच अदखलपात्र स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्धचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिस ठाण्याकडील कॉन्स्टेबल अरुण खोत, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती झुगर यांनी तयार केला. १० मे २०१६ रोजी तो गडहिंग्लज विभागाचे उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याकडे तपासणीसाठी पाठविला. सागर पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयात एस. टी. टोळीचा ‘मोक्का’चा प्रस्ताव पाठविला. यानंतर प्रभारी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अधिनियम ३(१), ३ (२), ३ (४) नुसार कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: S. T. Action of 'Mookka' on gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.