एस. टी. कर्मचाऱ्यांना पगाराचे मिळाले साडेसहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:46+5:302021-09-04T04:27:46+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.)ची गाडी काही केल्या सुरळीत होईनाशी झाली आहे. ...

S. T. Employees received a salary of Rs 6.5 crore | एस. टी. कर्मचाऱ्यांना पगाराचे मिळाले साडेसहा कोटी

एस. टी. कर्मचाऱ्यांना पगाराचे मिळाले साडेसहा कोटी

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.)ची गाडी काही केल्या सुरळीत होईनाशी झाली आहे. राज्यभरातील ९६ हजार कर्मचाऱ्यांना जुलै २०२१चा पगार शुक्रवारी दुपारी म्हणजे सप्टेंबरमध्ये मिळाला. यात कोल्हापूर विभागातील सुमारे ४,८०० कर्मचाऱ्यांचा ६ कोटी ४० लाख इतका पगार अदा करण्यात आला. आता कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पगाराची करावी लागणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना निर्बंध घातले. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच एस. टी. बसमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. कालांतराने कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा निर्बंध आणि एस. टी. महामंडळाचे उत्पन्न घटले. त्याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांचे पगार आणि डिझेलचा खर्च भागेनासा झाला. त्यामुळे दोन्हीवेळा राज्य शासनाने कोट्यवधींचा निधी देऊन राज्यातील ९६ हजार कर्मचाऱ्यांचे पगार अदा केले आहेत. दोन दिवसांपूर्वी जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्यांचा पगार अदा करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी एस. टी. महामंडळाकडे वर्ग केला. त्यामुळे राज्यातील सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार होणार आहेत. कोल्हापूर विभागाचा विचार करता, ४,८०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचा जुलै महिन्याचा ६ कोटी ४० लाख इतका पगार शुक्रवारी दुपारी अदा करण्यात आला. हा पगार सर्वांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमाही झाला. आता या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार अदा केला जाणार आहे. या पगारासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हाही पगार येत्या काही दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी आशा आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी गणेशोत्सव गोड करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट

जुलै महिन्याचा पगार शुक्रवारी दुपारी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आला आहे. आता ऑगस्टचा पगार सात तारखेला होईल.

- रोहन पलंगे, विभागीय नियंत्रक , एस. टी. महामंडळ कोल्हापूर विभाग

Web Title: S. T. Employees received a salary of Rs 6.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.