एस. टी. जाताना फुल्ल, येताना रिकामी
By admin | Published: July 28, 2016 12:26 AM2016-07-28T00:26:07+5:302016-07-28T00:53:40+5:30
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप
कोल्हापूर : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बेळगावकडे जाण्यासाठी जादा वीस बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, जाताना या बसगाड्या हाऊसफुल्ल, तर येताना मात्र रिकाम्या परत येत आहेत. या ‘बंद’मुळे कोल्हापुरातील कर्नाटक बसच्या दररोजच्या सुमारे २४० फेऱ्या रद्द झाल्या आहेत.
कर्नाटक राज्य शासनाने परिवहन कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी दहा टक्के वेतनवाढ दिली होती. यंदाही तेवढीच देण्यात आली आहे. तिला जोरदार विरोध करीत ‘परिवहन’च्या कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि. २५) पासून ‘बेमुदत बंद’ आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारी तिसऱ्या दिवशीही कर्नाटकमधील परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कोल्हापुरातील कर्नाटकातील विविध मार्गांवरील सुमारे २४० फेऱ्या रद्द झाल्या आहेत.
हा बंद आपल्या पथ्यावर पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने रत्नागिरी, कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आणि संभाजीनगर आगारामार्फत २० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. जाताना या गाड्या तुडुंब भरून जातात. मात्र, कर्नाटक पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव महाराष्ट्रातून येणाऱ्या एस. टी. गाड्यांना काकतीपर्यंत जाण्याची परवानगी दिली आहे. तिथून पुढे बेळगावमध्ये जाण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. त्यामुळे या गाड्यांना जाताना हाऊसफुल्ल व येताना चार-पाच प्रवासी घेऊनच परतावे लागत आहे.