एस. टी.चे कोल्हापूर विभागीय लेखाधिकारी देशपांडे यांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:17+5:302020-12-25T04:20:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : मे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत गडहिंग्लज व गारगोटी आगारातील उत्पन्न मध्यवर्ती कार्यालयात भरणा केले नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : मे ते ऑगस्ट महिन्यापर्यंत गडहिंग्लज व गारगोटी आगारातील उत्पन्न मध्यवर्ती कार्यालयात भरणा केले नाही. तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करत हे पैसे खर्च केल्याचा ठपका ठेवत कोल्हापूर विभागीय लेखाधिकारी उदय भास्कर देशपांडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून होणारी प्रवासी वाहतूक, मालवाहतूक व इतर उत्पन्नातून जमा होणारी रक्कम ही महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे वर्ग करायची असते. यातून मध्यवर्ती कार्यालयाकडून नोकर पगार, गाड्यांना होणारा खर्च, यात डिझेल, मेटेनन्स तसेच इतर कामांसाठी लागणारे स्टोअर पेमेंट मध्यवर्ती कार्यालय विभागीय कार्यालयांंकडे वर्ग करते.
कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे विभागीय लेखाधिकारी उदय देशपांडे यांनी गडहिंग्लज व गारगोटी आगारातील मे ते ऑगस्टपर्यंतच्या चार महिन्यातील ५० ते ६० लाख रुपयांचा भरणा मध्यवर्ती कार्यालयाकडे केला नाही. हे उत्पन्न त्यांनी येथील घरफाळा, वीजबिल व इतर कामांसाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. असा खर्च करण्याचा अधिकार देशपांडे यांना नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी चौकशी समितीचे दापोलीचे सिनियर अकौंटंट ऑफिसर किसन खुळपे व अंतर्गत लेखापरीक्षक भोसले यांनी कोल्हापूर विभागीय कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली आहे. देशपांडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. याची दखल घेऊन त्यांना ९ डिसेंबरला निलंबित केले आहे.
// प्रतिक्रिया //
विभागीय लेखाधिकारी उदय भास्कर देशपांडे यांचे निलंबन झाले आहे. देशपांडे यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका आहे. त्यामुळे मध्यवर्ती कार्यालयाकडून रितसर चौकशी सुरू आहे.
- रोहन पलंगे,
विभाग नियंत्रक, कोल्हापूर