सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव बँकेस ५ कोटी ४३ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:37+5:302021-04-07T04:24:37+5:30
संपूर्ण जगाची कोरोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था व जागतिक मंदीच्या काळातही डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव बँकेस या ...
संपूर्ण जगाची कोरोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था व जागतिक मंदीच्या काळातही डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव बँकेस या आर्थिक वर्षात ५ कोटी ४३ लाखांचा नफा झाला आहे. सा.रे. पाटील यांनी शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य वर्गाची आर्थिक पत सुधारावी व विकासाच्या दृष्टीने स्थापन केलेल्या बँकेने मार्गदर्शक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नफा मिळविला आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष महादेव राजमाने यांनी दिली.
बँकेने वर्षाअखेर एकूण ४९० कोटी ४ लाखांचा व्यवसाय केला आहे. बँकेकडे ३४५ कोटी ४६ लाखांच्या ठेवी असून, बँकेने आर्थिक वर्षाअखेर एकूण १४४ कोटी ५८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचा ढोबळ एनपीए ४.५० टक्के व निव्वळ एनपीए ०.७५ टक्के ठेवण्यास बँकेला यश आले आहे.
गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ६५00 एकर क्षारपड जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी बँकेने अल्प व्याजदरात कर्ज वितरित केले आहे. सध्या त्या जमिनी पिकाऊ झालेल्या आहेत. आणखी तालुक्यातील उर्वरित क्षारपड जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी बँकेचे कर्ज वितरण चालू आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजमाने यांनी केले आहे.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र बागे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कदम, विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष चौगुले, जनार्दन बोटे, सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.