सामान्य जनतेचे प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:10 AM2017-07-29T00:10:23+5:302017-07-29T00:10:58+5:30
इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा : शहर काँग्रेस समितीचे आंदोलन
इचलकरंजी : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, रेशन व्यवस्था यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तहसीलदार वैशाली राजमाने यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी अध्यक्ष प्रकाश मोरे, अशोक आरगे, शेखर शहा, सुनील पाटील, राहुल खंजिरे, राजू बोंद्रे, अमृत भोसले, रूपाली कोकणे, बिल्किस मुजावर, लक्ष्मी पोवार, शकुंतला मुळीक, नरसिंह पारीक, बाळासाहेब कलागते, आदींसह कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
१ शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य मार्गांवरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाजप सरकारकडून सर्वसामान्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न तत्काळ निर्गत करावेत, अशी मागणी करण्यात आली.
२ घरेलू कामगारांच्या समस्या, पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी यासह रेशनकार्डावरील बंद झालेले धान्य यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल बनली आहे. या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून गाºहाणे मांडूनही शासनाला जाग येत नाही. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
३ शासनाने याची दखल घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत. केसरी शिधापत्रिकाधारकांना धान्य द्यावे. आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी पाच किलोमीटर अंतराची अट शिथील करावी. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी उत्पन्नाची अट ५० हजार रुपये करावी. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान वाढवावे. घरेलू कामगारांच्या सन्मानधनाचा प्रश्न सोडवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.