कुंडलच्या मैदानात ‘साबा’ विजेता

By admin | Published: October 5, 2015 01:00 AM2015-10-05T01:00:51+5:302015-10-05T01:02:33+5:30

पाच लाखांचे इनाम पटकाविले : हनुमान आखाड्याचा ‘नवीन’ दुहेरी पटावर चितपट

'Saba' winners in the horoscope | कुंडलच्या मैदानात ‘साबा’ विजेता

कुंडलच्या मैदानात ‘साबा’ विजेता

Next


धनाजी आवटे -- कुंडल
गणेशोत्सवानिमित्त कुंडल (ता. पलूस) येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कुस्ती’ मैदानात पंजाबच्या प्रीतमसिंग आखाड्याचा मल्ल, हिंदकेसरी व भारत केसरी साबाने दिल्लीच्या हनुमान आखाड्याचा मल्ल, हिंदकेसरी, भारत केसरी व रुस्तुम ए हिंद पैलवान नवीन मोरला ८ व्या मिनिटाला दुहेरी पटावर चितपट केले व कुस्तीशौकिनांची वाहवा मिळवली. त्याने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना व अरुण लाड यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे रोख पाच लाखांचे बक्षीस व चषक मिळविला.
सायंकाळी ६ वाजता साबा विरुद्ध नवीन मोर यांच्यातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीस सुरुवात झाली. प्रथम दोघांनी एकमेकांची ताकद अजमावल्यानंतर दोघेही आक्रमक झाले. दोघांची सतत खडाखडी होत होती. साबा सतत आक्रमक पवित्रा घेत होता. अखेर ८ व्या मिनिटाला साबाने नवीन मोर याला दुहेरी पटावर चितपट केले.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा हिंदकेसरी व भारतकेसरी कृष्णकुमार व हरियाणाचाच हिंदकेसरी हितेश यांच्यात लावण्यात आली. रटाळ होत चालल्याने ही कुस्ती गुणांवर लावण्यात आली. कृष्णकुमारने आक्रमक पवित्रा घेत हितेशवर गुणांत आघाडी घेतली. अखेर कृष्णकुमार गुणांवर विजयी झाला. ४ लाख रुपये बक्षीसाची ही कुस्ती महेंद्रआप्पा लाड मित्रमंडळातर्फे लावण्यात आली होती.
तृतीय क्रमांकाची कुस्ती हिंदकेसरी सुनील साळुंखे व पंजाब केसरी काका परमितसिंग यांच्यात लावण्यात आली. प्रथम दोघांच्यात खडाजंगीनंतर सुनील साळुंखेने काकावर बगलडू डावावर कब्जा घेतला. काकाने या कब्जातून निसटण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुनील साळुंखेने आक्रमक पवित्रा घेत समोरून झोळी डावावर पैलवान काकाला चितपट केले व दोन लाख रुपये बक्षीस पटकावले.
चतुर्थ क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा ज्युनिअर परमिंदर व आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा कामगार केसरी कौतुक डाफळे यांच्यात लावण्यात आली. प्रथम कौतुक डाफळेने परमिंदरवर घुटना डावाचा प्रयत्न केला. त्यात परमिंदर निसटण्यात यशस्वी झाला. दोघेही सतत आक्रमक पवित्रा घेत होते. कुस्ती सतत रटाळ होत होती. शेवटी ही कुस्ती गुणांवर लावण्यात आली. या कुस्तीत कौतुक डाफळे गुणांवर विजयी झाला व त्याने किर्लोस्कर कंपनीच्यावतीने लावलेले २ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.
पाचव्या क्रमांकाची कुस्ती दिल्लीचा अमितकुमार व आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा किरण भगत यांच्यात दीड लाख रुपये बक्षिसासाठी लावण्यात आली. किरण भगतने आक्रमक पवित्रा घेत नवव्या मिनिटाला कोपराचा घुटना डावावर अमितकुमारला चितपट केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन रामचंद्र लाड यांच्यावतीने लावण्यात आली.
या मैदानात कुबेर पुजारी, निनाद बडरे, राहुल माने, तानाजी एडके, करेआप्पा, अक्षय खारगे, महेश मदने, रणजित खांडेकर, नीलेश पवार, प्रणव आवटे आदी मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. तसेच अविनाश पाटील विरुद्ध प्रवीण थोरात व सुशांत जाधव विरुद्ध सुहास गोडगे यांच्या कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. तसेच महिला मल्ल काजल जाधव हिनेही कुस्ती केली. प्रारंभी क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले.
(वार्ताहर)


क्षणचित्रे
येथे दुपारी १ वाजता मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे मैदान सुरुवात होण्यास विलंब झाला.
महाराष्ट्र चॅम्पियन प्रकाश कोळेकर यास उत्कृष्ट मल्ल म्हणून शामराव लाड पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख पाच हजार रुपये व चषक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता पैलवान नरसिंग यादव यास आॅलम्पिक सरावासाठी अरुण लाड यांनी एक लाख रुपये दिले.
रोहन सकटे याने मैदानात योगासने सादर केली.
मैदानास आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, सदाभाऊ खोत, रावसाहेब मगर, वस्ताद प्रकाश पाटील, जितेश कदम, पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे, उत्तम फडतरे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संजय शिंदे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी भेट दिली.
याप्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब लाड, श्रीकांत लाड, सर्जेराव पवार, हैबत लाड, उदय लाड, किरण लाड, डॉ. योगेश लाड, मुकुंद जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: 'Saba' winners in the horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.