स्थायी समिती सभापतिपदी सचिन पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:52 PM2020-08-25T18:52:44+5:302020-08-25T19:02:41+5:30
राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांची मंगळवारी स्थायी समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. सचिन पाटील कोल्हापुरातील नामवंत फुटबॉल खेळाडू आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांची मंगळवारी स्थायी समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. सचिन पाटील कोल्हापुरातील नामवंत फुटबॉल खेळाडू आहेत.
निवडीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने शुक्रवारी (दि. २८) निवडीची औपचारिकता पूर्ण होईल. दरम्यान, कोरोनाचे महासंकट असताना केवळ राजकीय हितासाठी निवडणूक घेतल्याचा आरोप करीत भाजप-ताराराणी आघाडीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीनुसार पुढील कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आहे. राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या पदासाठी सचिन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये या पदासाठी अर्ज करायचे होते. नगरसचिव सुनील बेंद्रे यांच्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक संदीप कवाळे, नियाज खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पवार, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची उपस्थिती होती.
सायंकाळी पाचपर्यंत केवळ एकच अर्ज आला. त्यामुळे सचिन पाटील यांची स्थायी समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची औपचारिकता होणार आहे.