सचिन सावंत यांची केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकीसाठी धडपड : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:08 PM2021-05-28T17:08:11+5:302021-05-28T17:11:19+5:30
chandrakant patil Politicis : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. मग, त्या वेळी झोपा काढत होता काय? अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
कोल्हापूर : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही. मग, त्या वेळी झोपा काढत होता काय? अशी विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
येथील सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते. शरद पवार यांनी मराठा समाजाचा मंडल आयोगामध्ये का समावेश केला नाही. एखादा समाज, जात मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार हा राज्याला असल्याचे १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सिध्द होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीचे सरकारने अद्याप मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. आता, तरी सरकारने हा आयोग स्थापन करावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
कसली वाट पाहत आहात?
राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही, मागासवर्गीय आयोगाची स्थापना, पुनर्विचार याचिका दाखल करणे, आरक्षणानुसार नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी सेवेत रूजू करून घेण्याबाबत कसली, कोणती वाट पाहत आहात, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
मी अनेक खाती सांभाळली आहेत. त्यामुळे निर्णय घ्यायला किती वेळ लागतो हे मला माहीत आहे. कोरोना आणि मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेण्याची सरकारची हिंमत नसल्याचे दिसते. हिंमत असेल तर या अधिवेशनाची तारीख सरकारने जाहीर करावी, असे त्यांनी सांगितले.