भ्रष्ट महापालिका बरखास्त करा
By admin | Published: June 24, 2015 12:36 AM2015-06-24T00:36:44+5:302015-06-24T00:42:16+5:30
शिवसेना : दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरण
कोल्हापूर : महापालिकेत भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शहरात पिण्याच्या पाण्यासह कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. शहरास पायाभूत सुविधा देण्यास कमी पडणारी ही महापालिका बरखास्त झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढून केली. दूषित पाण्याचे तोरण शिवसैनिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारास बांधले. आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देत क्षीरसागर यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
बिंदू चौकातून दुपारी साडेबारा वाजता या मोर्चास सुरुवात झाली. ‘भ्रष्ट महापालिका बरखास्त करा’ ‘शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, सुनील जाधव, नगरसेविका स्मिता माळी, नगरसेवक महेश कदम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील विविध प्रश्नांकडे शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही. बोगस दाखल्यांच्या आधारेच बहुसंख्य काँगे्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत. गेली ४० वर्षे शहराची हद्दवाढ न झाल्याने शहर गुदरमत आहे. रेड झोन क्षेत्रात भराव टाकून बांधकाम झाल्याने नागरी वस्तीत पुराचे पाणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मनपाच्या रुग्णालयात सुविधांची वानवा आहे.
झोपडपट्टी व फेरीवाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. असे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेली महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी आयुक्तांना सांगितले. किमान नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)