गरिबांची भाकरी बसली श्रीमंतांच्या ताटात! : ज्वारीचे दर पन्नाशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:48 AM2018-12-26T00:48:34+5:302018-12-26T00:48:47+5:30

कोल्हापूर : नुसती चटणी- भाकरी खाऊन दिवस काढले, असे गरिबीचे होणारे वर्णन आता केवळ कथा, कादंबऱ्यांमध्येच वाचायला मिळेल, अशी ...

In the sack of poor people sat down! : Jowar Rate Fifty Crosses | गरिबांची भाकरी बसली श्रीमंतांच्या ताटात! : ज्वारीचे दर पन्नाशी पार

गरिबांची भाकरी बसली श्रीमंतांच्या ताटात! : ज्वारीचे दर पन्नाशी पार

googlenewsNext
ठळक मुद्देज्वारी खाण्याचे, विक्रीचे प्रमाणही निम्म्यापर्यंत

कोल्हापूर : नुसती चटणी- भाकरी खाऊन दिवस काढले, असे गरिबीचे होणारे वर्णन आता केवळ कथा, कादंबऱ्यांमध्येच वाचायला मिळेल, अशी परिस्थिती आहे. वाढलेले दर आणि खाण्याच्या बदललेल्या सवयींमुळे भाकरी खाणे ही गरजेची नव्हे, तर चैनीची गोष्ट बनून गेली आहे. गरिबांची ही ताटातील भाकरी श्रीमंतांच्या ताटात जाऊन बसतानाच हॉटेलमधील मेन्यू कार्डवरही ऐटीत विराजमान झाली आहे.

यंदा तर दुष्काळामुळे ज्वारीची आवकच कमी झाल्याने, दराने कधी नव्हे ती पन्नाशी पार केली आहे. या तुलनेत गव्हाचे दर कमी असल्याने सर्वसामान्यांच्या घरात भाकरीची जागा चपातीने घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २0 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर ज्वारी पिकत असे; पण उसाला दर मिळू लागला, तसे ज्वारीची शेती लाखावरून अवघ्या तीन-चार हजार हेक्टरवर आली; त्यामुळे कोल्हापूरची गरज सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली आणि कर्नाटकातून येणाºया ज्वारीतून भागवली जाऊ लागली. बार्शीतून येणारा शाळू आणि कर्नाटकातून येणारा महिंद्रा या हायब्रीड ज्वारीची बाजारपेठ कोल्हापुरात वाढीस लागली; पण गेल्या काही वर्षांत रेशनवर गहू कमी किमतीत मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्याने सणावाराला दिसणारी चपाती गोरगरिबांच्या घरात रोजच दिसू लागली.

साहजिकच ज्वारी खाण्याचे प्रमाण कमी होत गेले, त्यात मधुमेहासारख्या आजाराचे प्रमाण वाढल्याने भाकरी खाऊ नये, खाल्लीच तर हलक्या प्रतीच्या ज्वारीची भाकरी खावी, असा सल्ला डॉक्टर देऊ लागले. आरोग्य आणि गरज याचा मोठा फटका ज्वारीला बसला. ज्वारी हळूहळू गरिबांच्या घरातून हद्दपार होत असताना, आता दुष्काळाने राहिलेली कसर पूर्ण करण्यास सुरुवात केली. ज्वारी पिकविणाºया नगर, सोलापूर, सातारा, सांगलीत दुष्काळामुळे ज्वारीचे पीक जेमतेमच आहे. मागणीच्या तुलनेत होणारे उत्पादन अत्यल्प असल्याने आतापासूनच ज्वारीच्या दराने अर्धशतकाचा उंबरठा ओलांडला आहे. दर वाढल्यापासून ज्वारीच्या खरेदीतही निम्म्याने घट झाली आहे. १0 किलो घेणारे ग्राहक आता ५ किलो मागत आहेत.
 

ज्वारीच्या आवकेत निम्म्याने घट
कोल्हापूरच्या धान्य बाजारात ज्वारीचे २५ घाऊक व्यापारी आहेत. त्यांच्याकडे रोज चार ट्रकची ज्वारी आवक होते. त्यांपैकी दोन ट्रक हे शाळूचे, तर एक ट्रक हलक्या ज्वारीचा, तर एक ट्रक महिंद्रा हायब्रीड ज्वारीचा येत होता. त्यातून रोजची किमान १५ लाखांची उलाढाल होत होती; पण या महिन्याभरात दर वाढल्यापासून दोन दिवसांतून एकदा तीन ट्रक येत आहेत. त्यात शाळूचा अवघा एक, तर महिंद्राचे दोन ट्रक येत आहेत; यामुळे उलाढालही ७ लाखांपर्यंत खाली आली आहे.


ज्वारीचे जिल्ह्यातील दर
शाळूच्या दरात गेल्या महिनाभरात प्रती किलो १0 ते २0 रुपये वाढ झाली आहे. नंबर एकचा शाळू ५६ रुपयांवर गेला आहे. पाच नंबरचा हलक्या प्रतीचा शाळूही २५ रुपयांवरून ३५ वर गेला आहे. महिंंद्रा ज्वारी १८ रुपयाला मिळायची, ती आता २८ रुपये प्रति किलोवर गेली आहे.
 

शाळूचे दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने कर्नाटकातून येणाºया हलक्या प्रतीच्या महिंद्रा या हायब्रीड ज्वारीची मागणी वाढली आहे. शाळूच्या मागणीत ६0 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये नवीन ज्वारी बाजारात येईपर्यंत दर चढेच राहणार आहेत.
- सदानंद कोरगावकर, व्यापारी

Web Title: In the sack of poor people sat down! : Jowar Rate Fifty Crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.