पंचगंगा नदीत आढळले आधारकार्डांनी भरलेले पोते, कोल्हापुरातील इचलकरंजीत उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:56 AM2023-02-13T10:56:20+5:302023-02-13T10:57:10+5:30

काही महिन्यांपूर्वी अशाच स्वच्छता मोहिमेवेळी शहरातील एका परिसरात कचरा कोंडाळ्यात मोठ्या संख्येने शिधापत्रिका आढळल्या होत्या.

Sacks full of Aadhaar cards found in Panchganga river in Ichalkaranji Kolhapur | पंचगंगा नदीत आढळले आधारकार्डांनी भरलेले पोते, कोल्हापुरातील इचलकरंजीत उडाली खळबळ

पंचगंगा नदीत आढळले आधारकार्डांनी भरलेले पोते, कोल्हापुरातील इचलकरंजीत उडाली खळबळ

googlenewsNext

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात स्वच्छता मोहीम सुरु असताना आधारकार्डांचे भरलेले पोते आढळल्याने खळबळ उडाली. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी हे पोते बाहेर काढून तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा केला असता सर्व आधारकार्ड इचलकरंजी शहरातील नागरिकांची असल्याचे आढळले आहे.

येथील पंचगंगा नदीपात्र परिसराची स्वच्छता राष्ट्र सेवा दलाच्यावतीने दर रविवारी सुरू असते. या स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीपात्रात एक पोते आढळले. उघडून पाहिले असता त्यामध्ये शेकडोंच्या संख्येने आधारकार्ड आढळली. बेवारस स्थितीत जीर्ण झालेल्या आधारकार्डांचा मोठा ढीग सापडल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पाहणी करून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोत्यातून आधारकार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ओरिजनल असल्याचे आढळले.

प्राथमिक तपासात आढळलेले सर्व आधारकार्ड शहरातील जवाहरनगर, भोनेमाळ तसेच परिसरातील कबनूर, कोरोची या भागातील आहेत. आधारकार्डांवरून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस व सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना संपर्क साधला. त्यावेळी अनेकांनी आमचे ओरिजनल आधार कार्ड घरीच असल्याचे सांगितले. यातून बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्यांची नावे शोधून तपास केला जाणार असून, त्याचा अहवाल तहसीलदार यांना पाठविण्यात येणार आहे.

दुसऱ्यांदा गंभीर प्रकार

काही महिन्यांपूर्वी अशाच स्वच्छता मोहिमेवेळी शहरातील एका परिसरात कचरा कोंडाळ्यात मोठ्या संख्येने शिधापत्रिका आढळल्या होत्या. त्याचा सखोल तपास झाला नाही, तोपर्यंतच आधारकार्डांचा ढीग सापडला. ही बाब गंभीर असून, बनावट कागदपत्रे तयार करून त्यातून काही गैरप्रकार घडत आहेत का, याचा गांभीर्याने तपास होणे आवश्यक असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: Sacks full of Aadhaar cards found in Panchganga river in Ichalkaranji Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.