सदाभाऊंनी असं करायला नको होतं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 06:03 PM2021-03-09T18:03:35+5:302021-03-09T18:05:56+5:30
Help Kolhapur- सदाभाऊ... साधा - सरळ,परखड असूनही जिंदादिल. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या या माणसाने पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तमाम गारगोटीकरांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, सदाभाऊंनी असं करायला नको होतं..!
राम मगदूम
गडहिंग्लज : सदाभाऊ... साधा - सरळ,परखड असूनही जिंदादिल. सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या या माणसाने पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तमाम गारगोटीकरांना मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य आहे, सदाभाऊंनी असं करायला नको होतं..!
आकुर्डे (ता. भुदरगड) येथील सदाशिव बाळू भांदीगरे (वय ६२) व त्यांची पत्नी सुरेखा (वय ५७) या दोघांनी शुक्रवारी(५ मार्च) राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.वयोमानामुळे त्यांना मधुमेह - रक्तदाबाचा त्रास होता. परंतु, एवढ्या कारणासाठी त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे नातेवाईकांसह पंचक्रोशी सुन्न झाली आहे.
गारगोटीच्या मौनी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ते लेखनिक होते.अत्यंत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असल्यामुळे विश्वस्तांनी त्यांच्यावर ट्रस्टची जबाबदारी दिली होती. चार वर्षापूर्वी सेवानिवृत्तीच्यावेळी त्यांनी महाविद्यालयाला २५ हजाराची देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु काही अडचणीमुळे ते राहून गेले होते. त्याची हुरहूर त्यांना होती.
इच्छा पुरी केली अन्..!
आत्महत्येच्या आदल्या दिवशी गुरूवारी सदाभाऊंनी आपल्या महाविद्यालयात जाऊन सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची भेट घेतली. प्राचार्यांकडे देणगीचा धनादेश सुपूर्द करून आपली अपुरी इच्छा पूर्ण केली. त्यानंतर गावातील नातेवाईक- मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. अन् दुसऱ्या दिवशी अर्धांगिनीसह जगाचा निरोप घेतला. भरल्या घरातून
दोघेही एकाच वेळी निघून गेल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
सामाजिक कामात नेहमीच पुढे..!
गारगोटीचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. मोमीन यांचा अलिकडेच नागरी सत्कार झाला. त्याच्या नियोजनात ते पुढे होते. सेवानिवृत्तीनंतर जेष्ठ नागरिक संघ, हरिनाम सप्ताह यासह गावातील सामाजिक कामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.