‘धामणी’ पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : सदाभाऊ खोत -- चौके येथे धामणी मध्यम जलसिंचन व विद्युत प्रकल्पासह विकासकामांच्या मंजुरीबाबत मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 11:24 PM2018-01-15T23:24:51+5:302018-01-15T23:25:32+5:30
दुर्गमानवाड : धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसामध्ये लावण्यात येईल.
दुर्गमानवाड : धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसामध्ये लावण्यात येईल. जोपर्यंत या प्रकल्पाचेकाम मार्गी लागत नाही तोपर्यंतस्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही फलोत्पादन, पाणी पुरवठा व
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
चौके (ता.राधानगरी) येथे धामणी मध्यम जलसिंचन व विद्युत प्रकल्पासह विकासकामांच्या मंजुरीबाबत सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, शेतकºयाला केंद्रबिंदू ठेवत उसाचा एफआरपी आणखीन दोनशे रुपयांनी आंदोलन न करता वाढ करण्यात येणार आहे. शेतकºयांच्या मालास चांगला भाव येण्यासाठी आयात मालावर अधिक कर बसवून शेतकºयांना दिलासादायक प्रयत्न केला, शेवटच्या पात्र शेतकºयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत कर्ज माफी योजना बंद होणार नाही. राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून मी स्वत: पर्यटनमंत्र्यासमोर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ए. वाय. पाटील म्हणाले, या विभागाचा विकास व्हावा यासाठी १९९६ साली या धरणाला प्रशासकीय मान्यता मिळाली. १४०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार या आशेने येथील लोकांनी जमिनी दिल्या. पण सतरा वर्षे प्रकल्प रखडला याकडे गांभीर्याने लक्ष देऊन धामणी प्रकल्प मार्गी लावण्याची गरज आहे. त्याचबरोबर या परिसरातील हत्ती कडा जलप्रपात धबधबा, माऊली कुंड यांना पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून त्यादृष्टीने विकास केल्यास येथील बेरोजगारी संपेल, असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी जयसिंगराव नागरे पाटील आणि माजी सरपंच एम. जी. गुरव यांनी धामणी खोºयाच्या प्रश्नांचा आढावा घेतला. थेट सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मानबेटचे सरपंच अश्विनी गोरुले, पडसाळीचे सरपंच तानाजी पाटील, दुर्गमानवाड सरपंच युवराज गुरव यांचा सत्कार खोत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे, सदस्य मोहन पाटील, तंटामुक्त अध्यक्ष एम. जी. गुरव, आप्पासाहेब पाटील, ग्रामसेवक व्ही. आर. गनबावले, शिवाजी गोरुले, विठ्ठल सुतार, लहू कुपले, अश्विनी शिंदे,राजू पाटील, चंद्रकांत कुसाळे, गुंडू कदम, तानाजी गुरव, दिलीप चव्हाण, तुकाराम गायकवाड, दगडू चौगले, देऊ पाटील उपस्थित होते.
चौके ( राधानगरी) येथे कार्यक्रमात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर सभापती दिलीप कांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.