सदाभाऊ म्हणजे स्वाभिमानी संघटना नव्हे
By Admin | Published: May 2, 2017 11:47 PM2017-05-02T23:47:38+5:302017-05-02T23:47:38+5:30
सदाभाऊ म्हणजे स्वाभिमानी संघटना नव्हे
सांगली : कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नसून, ते संघटनेचे एक कार्यकर्ते आहेत. त्यांना शेतकऱ्यांची गरज असेल तर दि. ४ मे रोजी कोल्हापुरात निघणाऱ्या मोर्चात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, सदाभाऊंना संघटनेच्या सर्व पदातून मुक्त केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ते पुढे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने ठराव घेऊनच सदाभाऊंना मंत्रिमंडळात पाठविले आहे. ते राज्यमंत्री असल्यामुळे त्यांचे अधिकार कमी आहेत. शेतकऱ्यांच्यादृष्टीने कोणताही ठोस निर्णय ते घेऊ शकत नाहीत, हे जरी खरे असले तरी, त्यांनी भाजप सरकारचे उदोउदो करण्याची काहीच गरज नाही. मित्रपक्षाचे मंत्री कसे वागतात तसे त्यांनी वागावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना साखर कारखाने विक्री घोटाळे आणि जलसिंचन घोटाळ्याबद्दल बैलगाडीभर पुरावे असल्याची वल्गना करीत होते. सत्तेवर येताच त्यांना त्यांच्या भाषणांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय ते घेत नाहीत. या सरकारचे कौतुक सदाभाऊंनी करण्याची काहीच गरज नाही. काहीवेळा ते उत्साहाच्या भरात भाजपबद्दल बोलत असतीलही; पण त्यांना सरकारच्या कौतुकाचा सोहळा थांबविण्याचाही आम्ही सल्ला देऊ, अशी बोचरी टीकाही शेट्टी यांनी केली.
सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सर्व पदे त्यांच्याकडून काढून घेतली आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आता प्रा. डॉ. प्रकाश पोकळे आहेत. दि. ४ मे रोजी कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. उसाला दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, शेतकऱ्यांना पेन्शन त्वरित लागू झाली पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी त्वरित लागू झाल्या पाहिजेत, या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांची खरंच सदाभाऊंना गरज वाटत असेल तर, त्यांनी कोल्हापूरच्या मोर्चात सहभागी व्हावे. आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यास मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण देत नाही. सदाभाऊंनीही मोर्चाच्या निमंत्रणाची वाट न पाहता आंदोलनात सहभागी व्हावे. आम्ही त्यांचे स्वागतच करू, असेही शेट्टी म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोकळे, माणिकराव कदम, नजीर वलांडकर, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील आदी उपस्थित होते.
बांधावर गेल्यास संवाद कळेल
मुख्यमंत्री फडणवीस विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करीत होते. तेच फडणवीस आता कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. संवादयात्रेचा गाजावाजा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, म्हणजे त्यांना संवाद की विसंवाद ते नक्कीच कळेल, अशी टीका शेट्टी यांनी केली. भाजप सरकारने तूर, कांदा, तेल आयात केल्यामुळे देशातील शेतकऱ्यांना १२ लाख कोटींचा तोटा झाला आहे. यामुळे कर्जमाफी करून शेतकऱ्यांवर उपकार करीत असल्याचे नाटकही करण्याची गरज नाही, असेही शेट्टी म्हणाले.
प्रतिटन ५०० रुपये द्या, नाही तर आंदोलन छेडणार
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू झाले, त्यावेळी साखरेला क्विंटलला २८०० रुपये दर होता. यामध्ये एक हजाराची वाढ होऊन आज ३८०० रुपये क्विंटल साखरेचा दर झाला आहे. साखरेच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ झालाच पाहिजे. यामध्ये साखर कारखानदार शेतकऱ्यांवर उपकार करीत नाहीत. दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन ५०० रुपये दर दिला पाहिजे. दरवाढ दिली तर ठीक, नाही तर दि. ४ मेनंतर सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.