सदाभाऊंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट---ऊसदर प्रश्नी श्रेयवादाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:53 AM2017-10-07T00:53:14+5:302017-10-07T00:53:36+5:30
कोल्हापूर : या गळीत हंगामात उसाला पहिली उचल म्हणून ‘एफआरपी’पेक्षा ३०० रुपये जादा मिळावेत, अशी मागणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/कोल्हापूर : या गळीत हंगामात उसाला पहिली उचल म्हणून ‘एफआरपी’पेक्षा ३०० रुपये जादा मिळावेत, अशी मागणी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
स्वाभिमानी संघटनेपासून फारकत घेतल्यानंतर दसºयाच्या मुहूर्तावर खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या इचलकरंजीत झालेल्या स्थापनेच्या मेळाव्यात त्यांनी उसाच्या पहिल्या उचलीची हीच मागणी केली होती.
यंदा पहिली उचल मीच ठरवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरची ऊस परिषद २८ आॅक्टोबरला आहे. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे; परंतु तोपर्यंत पहिल्या हप्त्याचा विषय चर्चेत ठेवायचा, सदाभाऊंनी मागणी करायची, तिला मुख्यमंत्र्यांनी संमती द्यायची व ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेतील व आंदोलनातीलही हवा काढून घ्यायची, अशी ही भाजपपुरस्कृत रणनीती आहे. त्याचाच भाग म्हणून खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यंदा बाजारात साखरेचा दर चांगला आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा पट्ट्यात उसाचा उतारा चांगला असतो. त्यामुळे ‘एफआरपी’पेक्षा सरासरी ३०० रुपये जास्त देण्यात यंदा कारखानदारांचीही खळखळ असणार नाही. परिणामी जे गणित सहजच सुटणार आहे, ते आपण घालून त्याचे श्रेय घेण्याचा सदाभाऊंचा प्रयत्न आहे.
राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आॅनलाईन करण्यात यावेत. याशिवाय साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ४००० रुपये असावा, मराठा आरक्षण संदर्भात तत्काळ मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती करावी, साखरेचे दर हे उद्योगधंद्यांसाठी आणि घरगुती उपयोगाकरिता वेगवेगळे आकारावेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन रयत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने खोत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, दीपक भोसले, सागर खोत, पांडुरंग शिंदे, आदी उपस्थित होते.