सदर बझार, शाहूपुरी तालीम परिसरात ‘ताराराणी’ भारी

By admin | Published: November 3, 2015 12:38 AM2015-11-03T00:38:09+5:302015-11-03T00:46:33+5:30

बारापैकी पाच ठिकाणी बाजी : काँग्रेस, भाजपला प्रत्येकी तीन जागा--ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय

Sadar Bazar, 'Tararani' heavy in Shahupuri Talim area | सदर बझार, शाहूपुरी तालीम परिसरात ‘ताराराणी’ भारी

सदर बझार, शाहूपुरी तालीम परिसरात ‘ताराराणी’ भारी

Next

कोल्हापूर : सदर बझार, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, शाहूपुरी तालीम परिसरात ‘ताराराणी आघाडी’च भारी ठरली आहे. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या बारापैकी पाच प्रभागांत ताराराणी आघाडी, काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी तीन प्रभागांत व राष्ट्रवादीला एका प्रभागात यश मिळाले. शिवसेना आणि अपक्षांना खातेही उघडता आले नाही.
सदर बझार प्रभागात ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी १६९१ मतांसह बाजी मारली. विद्यमान नगरसेवक महेश जाधव यांच्याबाबतची नाराजी, डॉ. प्रवीण कोडोलीकर गटाचे पाठबळ आणि विकासाच्या मुद्द्यावरील प्रचार माने यांना फायदेशीर ठरला. महाडिक वसाहतीमध्ये पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवाराच्या संपर्काकडे पाहून मतदान झाले. यात माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या स्नुषा व ताराराणी आघाडीच्या उमेदवार सीमा कदम या १४०५ मतांनी विजयी झाल्या. राजर्षी शाहू मार्केट यार्ड प्रभागात काँग्रेसच्या सुरेखा शहा आणि ताराराणी आघाडीच्या वर्षा कुंभार यांच्यात लढत रंगली. यात शहा यांनी १५६९ मतांनी विजय मिळविला. विक्रमनगरमध्ये १२९५ मतांसह काँग्रेसच्या शोभा कवाळे यांनी यशाला गवसणी घातली. त्यांच्याविरोधात ताराराणी आघाडीच्या पल्लवी जाधव, शिवसेनेच्या चंद्रिका सागर यांनी चांगली लढत दिली.
रुईकर कॉलनी प्रभागात भाजपच्या उमेदवार उमा इंगळे व नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पत्नी जयश्री यांच्यात चुरस रंगली. यात इंगळे यांनी १२४७ मतांनी बाजी मारली. साइक्स एक्स्टेंशन प्रभागात काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक संजय मोहिते व भाजपचे कुलदीप देसाई यांच्यात लढत झाली. यात १३०६ मतांनी संजय मोहिते यांनी विजय मिळविला. देसाई यांना ११०० मते मिळाली. टाकाळा खण-माळी कॉलनी प्रभागात भाजपच्या सविता भालकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यात खरी लढत झाली. यात ५० मतांनी सविता भालकर विजयी झाल्या.(प्रतिनिधी)


‘शाहूपुरी तालीम’वर पुन्हा नाईकनवरे
व्यापारी पेठ असलेल्या शाहूपुरी तालीम प्रभागात गेल्या पाच वर्षांत नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांचे वर्चस्व होते. यावेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रभागासाठी खुला झाल्याने नाईकनवरे यांनी स्नुषा पूजा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यांची पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ यांची स्नुषा वैष्णवी यांच्याशी लढत झाली. यात पूजा यांनी २२६१ मते मिळवून विजय मिळविला.


‘मुक्त सैनिक’मध्ये वाद नडला
मुक्त सैनिक वसाहतीमध्ये माजी आमदार पी. एन. पाटील यांचे समर्थक एकनाथ काटकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. सतेज पाटील आणि डकरे गटाचे समर्थक पंकज काटकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली. यात एकनाथ काटकर यांना २५६ तर, पंकज काटकर यांना १६३६ मते मिळाली. या ठिकाणी ताराराणी आघाडीने राजसिंह शेळके यांना उमेदवारी दिली. शेळके हे १८३७ मतांनी विजयी झाले.

Web Title: Sadar Bazar, 'Tararani' heavy in Shahupuri Talim area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.