महालक्ष्मी कॅलेंडरचे मालक सदाशिव शिर्के यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:56+5:302021-02-06T04:42:56+5:30

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध उद्योगपती, श्री महालक्ष्मी कॅलेंडरचे मालक सदाशिव (भाऊसाहेब) दत्तात्रय शिर्के (वय ७३) यांचे गुरुवारी सकाळी ...

Sadashiv Shirke, owner of Mahalakshmi calendar, dies | महालक्ष्मी कॅलेंडरचे मालक सदाशिव शिर्के यांचे निधन

महालक्ष्मी कॅलेंडरचे मालक सदाशिव शिर्के यांचे निधन

googlenewsNext

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध उद्योगपती, श्री महालक्ष्मी कॅलेंडरचे मालक सदाशिव (भाऊसाहेब) दत्तात्रय शिर्के (वय ७३) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. महालक्ष्मी कॅलेंडरचे संस्थापक दिवंगत डी. एन. शिर्के यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते उत्तम कलाकार व छायाचित्रकार होते. त्यांना वाचनाची व प्रवासाची आवड होती. त्यांनी इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनीसारख्या विविध देशांचे दौरे करुन प्रिंटिंग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला होता.

समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी उभा मारुती मंदिराचा जीर्णोद्धार, शिवाजी तरुण मंडळाच्या इमारतीचे बांधकाम या कामात पुढाकार घेतला. सदाशिव शिर्के त्यांनी १९७७पासून श्री महालक्ष्मी दिनदर्शिका प्रकाशित करुन त्याचा ५ राज्ये व ५ भाषा असा विस्तार केला. शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी त्यांनी केळूसकर यांचे शिवचरित्र मराठी व इंग्रजी भाषेत कमी किमतीत प्रकाशित करुन नागरिकांपर्यंत पोहोचवले. ते सरस्वती पब्लिशिंग कंपनीचे कार्यकारी संचालक तसेच प्रीमिअर प्रिंटर्स व पॉवर प्रेस या कंपन्यांचे भागीदार होते. गेले काही दिवस तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होेते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पंचगंगा स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवाजी पेठेत १२ जानेवारी १९४८ला जन्मलेले सदाशिव यांनी वडील डी. एन. शिर्के यांनी सुुरु केलेला कॅलेंडर व्यवसाय सरस्वती पब्लिशिंग कंपनीमार्फत प्रकाशित करत त्याचा विस्तार केला. त्यांनी १९८० साली घरीच सुरु केलेला प्रिंटिंग प्रेसचा विस्तार इतका वाढवला की, कळंबा येथे तीन मजली इमारतीत तो हलवावा लागला. कळंब्यातील इमारत अपुरी पडू लागल्यावर २००५मध्ये या प्रेसचे स्थलांतर कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथे केले.

--

फोटो नं ०४०२२०२१-कोल-सदाशिव शिर्के (निधन)

---

Web Title: Sadashiv Shirke, owner of Mahalakshmi calendar, dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.