‘लोकमत’ ची साद : हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्या मदतीसाठी सरसावले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 03:57 PM2018-10-06T15:57:16+5:302018-10-06T16:23:19+5:30
७४ वर्षीय हिंदकेसरी दीनानाथसिंह हे गेल्या तीन महिन्यांपासून प्रोस्टेट ग्रंथींची वाढ आणि फुप्फुसातील रक्ताच्या गाठीने त्रस्त आहेत. प्रोस्टेट ग्रंथींच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना आर्थिक मदत करण्याची साद ‘लोकमत’ ने समाजाला दिली. त्याला प्रतिसाद देत समाजातील विविध दानशूर संस्था, व्यक्ती यांचे हात मदतीसाठी सरसावले.
संतोष मिठारी
कोल्हापूर : ७४ वर्षीय हिंदकेसरी दीनानाथसिंह हे गेल्या तीन महिन्यांपासून प्रोस्टेट ग्रंथींची वाढ आणि फुप्फुसातील रक्ताच्या गाठीने त्रस्त आहेत. प्रोस्टेट ग्रंथींच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना आर्थिक मदत करण्याची साद ‘लोकमत’ ने समाजाला दिली. त्याला प्रतिसाद देत समाजातील विविध दानशूर संस्था, व्यक्ती यांचे हात मदतीसाठी सरसावले.
गेल्या १७ महिन्यांपासून राज्यशासनाकडून निवृत्तिवेतन मिळाले नसल्याने या शस्त्रक्रियेचा खर्च कसा करायचा, हा प्रश्न हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्यासमोर उभा राहिला. ‘हिंदकेसरी’ची गदा पटकावून कोल्हापूरचा नावलौकिक देशपातळीवर करणाऱ्या दीनानाथसिंह यांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात हवा आहे.
याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने (दि. २९ सप्टेंबर) च्या अंकात प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून समाजातील विविध संस्था, व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. आर्थिक मदतीचा अखंडपणे झरा वाहू लागला. प्रत्यक्ष भेटून अनेकांनी मदत दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे समन्वयक विजय जाधव यांनी हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्या घरी भेट घेतली.
या दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी मोबाईलवरून त्यांच्याशी चर्चा केली. यात तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्यावरील शस्त्रक्रिया व औषधोपचारांच्या खर्चाचा विचार करू नका. जी काही मदत लागेल, ती पुरविली जाईल, असे आश्वासन दिले. आमदार चंद्रदीप नरके यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ मधून पाच लाखांची तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
आमदार अमल महाडिक यांनी उपचारासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी बोलणे झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे, असे आश्वासन त्यांनी हिंदकेसरी दीनानाथसिंह यांच्या कुटुंबीयांना दिले.
आयुष्यभराच्या औषधोपचारांची जबाबदारी
राजर्षी शाहू महाराजांचे वारसदार व आद्य कर्तव्य म्हणून ‘म्हाडा,’ पुणेचे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे पुढे आले. त्यांनी हिंदकेसरी दीनानाथसिंह यांंच्या आयुष्यभराच्या औषधोपचारांची जबाबदारी उचलू, असे आश्वासन देत त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रकमेचा धनादेश दिला.
मदतीचा हात यांनी दिला
- पुणे गोकुळ तालमीचे वस्ताद शामराव यादव यांच्याकडून एक लाख रुपये
- माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याकडून आवाडे कुटुंबीयांतर्फे ५० हजार रुपये
- कोल्हापूर जिल्हा तालीम संघाकडून ५० हजार रुपये
- कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्याकडून २५ हजार रुपये
- ‘यूएसके अॅग्रो’तर्फे सांगलीचे उमाकांत माळी यांच्याकडून २५ हजार रुपये
- उद्योजक उमेशसिंह यांच्याकडून २५ हजार रुपये
- ‘महाराष्ट्र केसरी’ राहुल काळभोर यांच्याकडून ५० हजार रुपये
- महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते यांच्याकडून २१ हजार रुपये
- परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून १५ हजार रुपये
- वसई-विरार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,
- गोल्ड माईन स्टॉक लिमिटेडचे प्रादेशिक प्रमुख किशोर धारे
- संदीप यादव
- जमीर मुल्लाणी
- तानाजी शिंदे
- संदीप पाटील
- कमलेश तांदळे आणि मित्र परिवारातर्फे रोख एक लाख रुपये
- कोतोली येथील परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उपचारासाठी १५ हजार रुपये
- उजळाईवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने यांच्याकडून ५ हजार रुपये