‘सदिच्छादूत राही, विरधवल ’ मतदानापासून दुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 04:16 PM2019-04-24T16:16:20+5:302019-04-24T16:21:43+5:30
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत म्हणून निवडणूक आयोग व शासनातर्फे नियुक्ती केली होती. सदिच्छादूत म्हणून निवड केलेल्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू वीरधवल खाडे या दोघांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले. यात परदेश दौरा व सरावाचे कारण दोघांनीही दिले आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत म्हणून निवडणूक आयोग व शासनातर्फे नियुक्ती केली होती. सदिच्छादूत म्हणून निवड केलेल्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू वीरधवल खाडे या दोघांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले. यात परदेश दौरा व सरावाचे कारण दोघांनीही दिले आहे.
समाज माध्यमे, मुद्रीत माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे या माध्यमाबरोबरच विविध जाहीरात फलक,भित्तीपत्रक याद्वारे सदिच्छादूत लोकशाही सृदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करीत होते. मात्र, कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत ही चीन येथे २१ ते २९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी गेली आहे. त्यामुळे तिला मतदानाचा पवित्र हक्क बजावता आला नाही.
आॅलंपियन जलतरणपटू विरधवल खाडे हाही बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करीत असून त्याला मतदान करण्यासाठी त्याचा प्रशिक्षकांनी सुट्टी दिली नाही. त्यामुळे दोन्ही सदिच्छादूतांना स्वत:ला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
या दोघांबरोबर सदिच्छादृत म्हणून निवड झालेले अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, निशिगंधा वाड, उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना , महिला धावपटू ललिता बाबर, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता निलेशसिंग यांनीही मतदानाचा पवित्र हक्क बजावला. विशेष म्हणजे मागील २०१४ च्या निवडणूकीत राही व वीरधवल यांची सदिच्छादूत म्हणून निवड झाली होती. यंदा निवड होवूनही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
चीन येथे २१ ते २९ एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी ती यापुर्वीच रवाना झाली आहे. त्यामुळे तिला सदिच्छादूत असूनही मतदानाचा पवित्र हक्क बजावता आला नाही.
- जीवन सरनोबत,
राहीचे वडील
बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेची वीरधवल जय्यत तयारी करीत आहे. तेथे त्याला प्रशिक्षकांनी मतदान करण्यासाठी परवानगी नाकारल्याने तो कोल्हापूरात मतदानासाठी येवू शकला नाही.
-विक्रमसिंह खाडे,
वीरधवलचे वडील