‘स्वाभिमानी’च्या प्रश्नावर सदाभाऊंच्या उत्तराची उत्सुकता
By admin | Published: July 8, 2017 06:35 PM2017-07-08T18:35:18+5:302017-07-08T18:35:18+5:30
२१ जुलैला २३ प्रश्नांची उत्तरे देणार : ‘आत्मक्लेश’ ऐवजी ‘शिवार’यात्रेत रमण्याचे कारण काय?
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ८ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी खासदार राजू शेट्टींनी ‘आत्मक्लेश’यात्रा काढली; पण यामध्ये सहभागी न होता भाजप सरकारच्या ‘शिवार’यात्रेत सहभागी झाला, हे योग्य आहे का? यासह तब्बल २३ प्रश्नांची उत्तरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे मागितली आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांसह सदाभाऊ खोत २१ जुलैला चौकशी समितीपुढे हजर होणार असून ‘स्वाभिमानी’ने विचारलेल्या प्रश्नांवर भाऊ नेमकी उत्तरे काय देतात? याविषयी उत्सुकता लागली आहे.
सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाल्यापासून खोत व राजू शेट्टी यांच्यात मतभेद सुरू झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत खोत दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप संघटनेतून केला गेला. त्यात भरीस भर म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत खोत यांनी सुपुत्र सागर खोत यांना रिंगणात उतरविले; पण हा निर्णय घेताना राजू शेट्टी यांना विश्वासात घेतले नसल्याने त्यांनी विरोध केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर खोत यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली नाही. उलट शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारमध्ये राहून सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. शेतकरी कर्जमाफीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी सरकार धार्जिणी भूमिका घेतल्याचा राग शेट्टी यांच्या मनात होता.
स्वामिनाथन आयोग लागू करा, सात / बारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी पुणे ते मुंबई ‘आत्मक्लेश’ यात्रा काढली. यामध्ये खोत सहभागी झाले नाहीत; पण उलट त्यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रेची खिल्ली उडविल्याने शेट्टी चांगलेच संतप्त झाले. यामुळे ‘स्वाभिमानी’ने खोत यांच्या एकूणच वागणुकीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तब्बल २३ प्रश्नांवर त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते; पण आयोग लागू करता येत नसल्याचे त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का? यावर आपले मत काय?.
शेट्टी यांच्या ‘आत्मक्लेश’ यात्रेऐवजी ‘शिवार’ यात्रेत सहभागी झाला, हे खरे आहे. मात्र, राज्यमंत्री झाल्यापासून आपण चळवळीविरोधात केलेल्या कृत्यांमुळे आपणास पश्चात्ताप होतो का? असे प्रश्न विचारले आहेत. शेट्टी-खोत यांचे मनोमिलन अशक्यच! खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. एकमेकांवरील बोचरी टीका पाहता आता कोणी कितीही प्रयत्न केले तर दोघांचे मनोमिलन अशक्य असल्याची चर्चा संघटनेत सुरू आहे.