साधना कांबळेंच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: May 29, 2014 01:10 AM2014-05-29T01:10:57+5:302014-05-29T01:11:07+5:30
विजय सूर्यवंशी : प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्तालयाकडे पुण्याला पाठविणार
विजय सूर्यवंशी : प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्तालयाकडे पुण्याला पाठविणार कोल्हापूर : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या अपंगांच्या बनावट ओळखपत्रांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सखोल चौकशी करून जि. प. समाजकल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता साधना कांबळे यांची अपंग कल्याण आयुक्तालय यांच्यामार्फत खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यांना पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मध्यवर्ती बसस्थानक येथे सापडलेल्या बनावट अपंगाच्या ओळखपत्रावर समाजकल्याण अधिकार्यांच्या सह्या खर्या असून, ही ओळखपत्रे जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागातून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींची ‘अपंग’ म्हणून नोंदही या कार्यालयाकडे प्रथम करण्यात आली. तसेच नोंदवहीत दोन्ही नावांच्या पुढे खाडाखोड करून फोटोही काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने ही ओळखपत्रे ‘त्या’ व्यक्तीने परस्पर चोरी केली की कार्यालयातीलच काही व्यक्तींना हाताशी धरून ही बाहेर काढली, या प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील रजिस्टर जिल्हा समाजकल्याण अधिकारी ताब्यात घेऊन बनावट दाखले देण्याच्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांच्याकडे सादर केला होता.