श्रुती लुंकड बनल्या साध्वी मोक्षदाश्री
By admin | Published: February 7, 2017 12:26 AM2017-02-07T00:26:27+5:302017-02-07T00:26:27+5:30
दीक्षा महोत्सव : प्रापंचिक जीवनाचा त्याग करून धरली वैराग्याची कास
इचलकरंजी : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दीक्षा समारंभात श्रमण संघीय सल्लागार दिनेश मुनी यांनी सोमवारी १९ वर्षांच्या श्रुती लुंकड यांना दीक्षामंत्र देऊन त्यांचे मोक्षदाश्री असे नामकरण केले. तसेच त्यांना साध्वी पुष्पवती यांच्या सुशिष्या, प्रियदर्शना यांच्या लहान गुरुभगिनी आणि डॉ. अर्पिताश्री यांच्या शिष्या घोषित केले. मोक्षदाश्री यांच्या निरोप समारंभावेळी श्रावक-श्राविकांचे डोळे भरून आले आणि वातावरण ममतामयी बनले.
इचलकरंजी सकल जैन समाजाच्यावतीने शहरातील हा पहिला जैन दीक्षा समारंभ असल्याची माहिती पुष्करवाणी गु्रपच्यावतीने देण्यात आली.
सोमवारी सकाळी ७.३० वाजता वीरक्षल कार्यक्रम पार पडला. यानंतर मुमुक्षू श्रुती यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय बनले. मिरवणूक गुरुआनंद पुष्कर देवेंद्र भवन येथे आल्यानंतर मुमुक्षू श्रुती यांनी आपले अनुभव सांगितले व यापूर्वी काही चुका झाल्या असल्यास माफ करण्याची विनंती केली.
सल्लागार दिनेश मुनी यांचे मंगलपाठ झाल्यानंतर मुमुक्षू श्रुती यांनी वेश परिधान करून केशलोचन केले. केसरयुक्त श्वेतवस्त्र धारण केलेल्या श्रुती यांनी उपस्थित साध्वींना नमस्कार करून आशीर्वाद घेतले आणि आई-वडील, श्रीसंघ यांची
अनुमती घेऊन दीक्षा देण्याची विनंती केली. यानंतर दीक्षा विधीला प्रारंभ झाला.
दिनेश मुनी यांनी श्रुती यांना २७ वेळा नवकारमंत्र, तसउत्तरी लोगस, नमोत्थुणं, तीन वेळा करेमी भत्तेचा पाठ शिकविला व अहिंंसा ध्वज आणि ओगा प्रदान केले. याचबरोबर पात्र, ग्रंथही दिले. सुरुवात नवकार मंत्राच्या महास्तुतीने झाली.
यादरम्यान, मुमुक्षू श्रुती यांचे वडील प्रवीण लुंकड, आई मोनादेवी, भाऊ प्रतीक आणि बहीण रक्षा यांचा संघाचे अध्यक्ष पद्मा खाबिया, मंत्री महावीर बोर्दिया, उपाध्यक्ष मीठालाल लुंकड, सदस्य गौतमचंद मुथा, अशोक सालेचा व जीवनसिंंह पुनमिया, आदी सदस्यांनी त्यांना अभिनंदन पत्र व शाल देऊन सत्कार केला. कार्यक्रमात डॉ. पुष्पेन्द्र मुनी, डॉ. द्वीपेन्द्र मुनी, गौरव मुनी, श्री रत्नज्योतिजी, श्री प्रतिभाकुंवर, श्री वीरकांता, मणिप्रभा, श्री पीयूषदर्शना, तेलातप आराधक विवेक मुनी, संभव मुनी, श्री प्रियदर्शना, साध्वी रत्नज्योती, किरणप्रभा, डॉ. विचक्षणश्री, डॉ. अर्पिताश्री, वंदिताश्री, महासाध्वी वीरकांता, वीणाजी, अर्पिता व हितिकाश्री, प्रतिभाकंवर, साध्वी प्रफुल्ला, पुनिता, हंसाजी, डॉ. उदिताश्री, दक्षिताश्री, विषुद्धिश्री, साध्वी मणिप्रभा, ऋतुजाजी, आस्थाजी, पीयूषदर्शना, साध्वी रुचकदर्षना यांनी मनोगत व्यक्त करून मोक्षदाश्रींना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री कल्लापाण्णा आवाडे, अलका स्वामी यांनी मोक्षदाश्री यांच्याकडून आशीर्वाद घेतले. कवी ओम आचार्य यांनी सूत्रसंचालन, पद्मा खाबिया यांनी स्वागत, तर मंत्री महावीर बोर्दिया यांनी आभार मानले
६५वी दीक्षार्थी
विश्व संत उपाध्याय पुष्कर मुनी यांच्या संप्रदायामधील या ६५ व्या दीक्षार्थी आहेत. .