‘सदरा’फेक आंदोलन
By admin | Published: November 5, 2015 11:39 PM2015-11-05T23:39:56+5:302015-11-05T23:57:37+5:30
स्वाभिमानी संघटना : प्रवासी वाहतुकीविरोधातील ‘आरटीओ’ने कारवाई रोखावी
कोल्हापूर : गेल्या शुक्रवारपासून हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर ‘आरटीओ’कडून कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक व्यवसाय करणारे बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार असून, नोकरी नसल्याने या व्यवसायात आले आहेत. यासह मंदी आणि दुष्काळी परिस्थिती यांचा विचार करून प्रादेशिक परिवहनने सुरू केलेली कारवाई रोखावी, या मागणीसाठी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘सदरा’फेक आंदोलन केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात संघटनेचे कार्यकर्ते महेश कांदेकर यांनी वाहतूक व्यावसायिकांविरोधात सुरू केलेली ही कारवाईची मोहीम मंदी, दुष्काळ आणि बेरोजगारी यांचा विचार करून बंद करावी, अशी मागणी करीत स्वत:च्या अंगातील ‘सदरा’ काढून थेट प्रादेशिक परिवहन अधिकारी दराडे यांच्या दिशेने फेकला. निवेदन देण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांकडून अचानक असा प्रयत्न झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी वर्ग काहीकाळ थबकले. पुन्हा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाअध्यक्ष भगवान काटे यांनी ऐन दिवाळीत अशा पद्धतीची वाहतूक व्यावसायिकांवर कारवाई करीत गोरगरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे काम आपल्या कार्यालयाने करू नये. याचबरोबर जे वाहतूक व्यावसायिक कायद्याच्या चौकटीत राहून वाहतूक करणार नाहीत, अशा कार्यकर्त्यांवर कारवाई केली, तर आमची काहीही हरकत नाही. मात्र, सरसकट सर्वांवर ही कारवाई करू नये. ही कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी काटे यांनी लावून धरली. ही कारवाई त्वरित बंद करावी, अन्यथा सोमवार (दि. ९)पासून अचानक रास्ता रोको यासारखे तीव्र आंदोलन करण्याचा विचार करू. यावेळी कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार सकारात्मक करून ही बाब परिवहन आयुक्तालयापर्यंत पोहोचवू किंवा शक्य झाल्यास ही कारवाई दिवाळी सणापुरती तरी पुढे ढकलू, असे आश्वासन दराडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी शैलेश चौगुले, राजू पवार, आनंदराव कुदळे, जितेंद्र कटकोळे, बालेखान मुल्ला, राजू माढकर, दस्तगीर शेटके, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.