साेपानराव नि मुख्यमंत्री...! - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:15+5:302021-09-25T04:23:15+5:30

राज्याच्या मागास विभागातून आमदार साेपानराव पाटील खडकेवर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले हाेते. त्यांचे अन् मुख्यमंत्र्यांचे दाट अन् जिव्हाळ्याचे ...

Saepanrao and the Chief Minister ...! - Part 1 | साेपानराव नि मुख्यमंत्री...! - भाग १

साेपानराव नि मुख्यमंत्री...! - भाग १

Next

राज्याच्या मागास विभागातून आमदार साेपानराव पाटील खडकेवर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले हाेते. त्यांचे अन् मुख्यमंत्र्यांचे दाट अन् जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध जुळलेले हाेते. निवडक आमदारांच्या मंत्रिमंडळात समावेश करताना आ. साेपानराव पाटील यांना ‘कॅबिनेट मंत्रीपद’ देण्याचे आश्वासन प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू हाेती. सगळ्यांचेच लक्ष आजच्या बैठकीकडेच लागले हाेते.

काही वेळा अचानक एखादी अकल्पित घटना अशी घडते अन् सगळेच रागरंग बदलून जातात! ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी पाठविलेल्या तातडीच्या संदेशानुसार, नुकतेच विराेधी पक्षातून सत्तारूढ पक्षात प्रवेश केलेले ‘बाहुबली’ नेते आमदार काैतुकराव किल्लेदार यांना कॅबिनेट मंत्रीपदावर नियुक्त करण्यास अन् त्यांच्याकडे राज्य महसूल खात्याच्या मंत्रीपदाचा पदभार साेपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जाहीर झाले.

आ. साेपानराव पाटील या निर्णयामुळे खूप नाराज अन् अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ‘आपण दिलेल्या आश्वासनावर मी विसंबून हाेताे, पण विपरीतच घडले अन् पदरात निराशाच पडली...’ मुख्यमंत्री त्यांची समजूत घालताना म्हणाले, ‘हे लक्षात घ्या पाटील! तुम्हाला कॅबिनेट मंंत्रीपद देण्याचे मी निश्चितच केले हाेते, पण ऐनवेळी अकल्पितपणे आलेल्या पक्षश्रेष्ष्ठींच्या तातडीच्या आदेशामुळे माझा नाइलाज झाला. असाे. येत्या काही दिवसांत मी तुमच्यासाठी अनुकुल निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे, अन् त्यासाठी पक्षश्रेष्ठींची अनुमतीही मिळाली आहे.’

आठवड्याभरानंतरच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार आमदार साेपानराव पाटील यांच्याकडे महसूल खात्याच्या ‘राज्यमंत्री’पदाचा कार्यभार साेपविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ‘राज्यमंत्री’ साेपानराव पाटलांनी स्वत:च्या मनाला बजावले की, ‘दुय्यम दर्जाचे हे कनिष्ठपद अनिच्छेने का हाेईना लाभले यातच यापुढे समाधान मानावे लागणार आहे. ‘मनुष्य: चिन्तयेत् ऐकम्, दैवम् अन्यत्र चिन्तयेत्’ हेच सत्य ठरते.

कॅबिनेटऐवजी राज्यमंत्रीपद मिळाल्यापासून साेपानरावांचा ‘रुतबा’ कमी झाला हाेता. कुणीही त्यांच्या पदाची फारशी दखल घेत नव्हते. जाे कुणी येई ताे फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच भेटण्यासाठी आलेला असे. साहजिकच राज्यमंत्री साेपानरावांची उदासीनता अन् अस्वस्थपणा वाढत गेला. सध्या त्यांच्याकडे ‘करण्या’सारखे काेणतेही काम राहिले नव्हते.

साेपानरावांना नेहमी उदास राहताना पाहून त्यांची निजी सचिव गुरुदास पाण्डे यांनी अखेरीस त्यांना विचारलेच, ‘सर काय झालं आहे? आपण नेहमी अस्वस्थ दिसता! काही विशेष घडलंय का?’

‘अरे भावा, काय सांगू? कुणीही मला आताशा भेटण्यासाठीही येत नाही! समाेर कॅबिनेट मंत्र्यांच्या दालनासमाेर भलीमाेठी रांग लागलेली असते.’ साेपानरावांनी आपली खंत सचिवांपुढे बाेलून दाखविली.

‘बस्स, फारच क्षुल्लक गाेष्ट आहे ही सर! - आपण म्हणत असाल तर मी एक उपाय सुचवू का?’

सचिव गुरुदास पाण्डे, या राजकारणातील सव्यापसव्याचे ‘आचार्य चाणक्य’ किंवा ‘गुरू’ मानले जात हाेते. त्यांच्या या कर्तबगारीचा लाभ अनेक मंत्र्यांना त्यांचे ‘शागीर्द’ म्हणजे सचिव असताना ‘संकट विमाेचक’ म्हणून झालेला हाेता.

राज्यमंत्री साेपानराव पाटील यांच्या चिंतेवर ‘मार्ग’ सुचविण्यासाठी विचारणा करताना चाणाक्ष सचिव पाण्डे यांनी नफा-नुकसानीचा विचार केला हाेताच.

मंत्री साेपानराव गहिवरून पाण्डे यांना म्हणाले, ‘अरे भावा! आता फार लांबण लावू नकाेस! लवकर काय उपाय आहे ते सांग!’

आपली अस्वस्थता उन् उतावळेपणा काही क्षण लपवून आपले पूर्ण लक्ष पाण्डेजीवर एकवटले.

‘सर, आपल्याकडे साेपविण्यात आलेल्या महसूल खात्यांत बरेच कर्मचारी १०/१२ वर्षांपासून खुर्चीवर चिकटून ठाण मांडून बसले आहेत. त्यांची तातडीने गडचिराेली जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचा आदेश जारी करा! तसेच अनेक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची अथवा ‘सस्पेंड’ करण्यात येत असल्याची ‘वाॅर्निंग पाठवा. तूर्त हाच उपाय आपणापुढे मांडला आहे!’ सचिव पाण्डे.

‘पण यामुळे काय साध्य हाेईल?’

साेपानरावांनी निरागसपणे शंका व्यक्त केली.

‘यामुळे सर! आपली समस्या मिटेल अन् आपल्या इच्छेनुरूप सर्व काही घडेल.’ पाण्डे.

‘ठीक आहे! पण कॅबिनेट मंत्रीजी यात काही खाेडा तर घालणार नाहीत?’ - साेपानराव.

‘त्याची चिंता आपण मुळीच करू नका! मी ते पाहीन...! तसे पाहू गेल्यास आपण तर मा. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आहात!’ सचिव पाण्डे यांनी त्यांना दिलासा दिला. त्या आश्वासनामुळे मंत्री साेपानराव यांचे धैर्य वाढले, आशा पल्लवित झाल्या, अन् पुढील पाऊल उचलण्यासाठी त्यांनी पाण्डे यांना अनुमती दिली.

मग काय पाहता? सचिव पांडे यांनी प्रत्येक कागदपत्रावर मंत्री साेपानराव यांची सही व शिक्का उठवून, कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे, कामावरून काढून टाकण्याचे अन् बदल्यांचे आदेश निर्वेधपणे जारी करण्यास सुरुवात केली.

या कामगिरीमुळे कर्मचाऱ्यांच्या विश्वात भूकंप झाल्याप्रमाणे हाहाकार उडाला.

Web Title: Saepanrao and the Chief Minister ...! - Part 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.