सुरक्षिततेचे उपायही तितकेच प्रभावी हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:25 AM2017-08-12T00:25:24+5:302017-08-12T00:25:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यभरात दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्रभर सुरू ठेवण्यासाठी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री विधानसभेत विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक, व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर शासनाने सुरक्षिततेच्या मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करावा, अशी मागणीही केली आहे.
विधानसभेत दुकाने, मॉल्स, रेस्टारंटसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी दुकाने व आस्थापना (गुमास्ता) कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. यामुळे रात्रभर खाण्यापिण्याची चंगळ अनुभवता येणार आहे.
कोल्हापूर शहराचा विचार करता, करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. ते रात्री बारानंतर कोल्हापुरात आले तर त्यांना जेवण, राहणे, प्रवासी वाहतुकीची सोय होत नाही. मात्र, शासनाच्या विधेयक मंजुरीने ही सुविधा मिळण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे या विधेयकाचे अनेक व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.
त्याचबरोबर रात्रभर ही आस्थापने, प्रतिष्ठाने, हॉटेल्स सुरू ठेवल्याने सुरक्षिततेचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. विशेषत: बार, मद्य, आदींच्या विक्रीसाठी निर्बंध हवेत, असा एकूणच सर्व स्तरांतून सूर उमटत आहे.
कोल्हापुरातील आस्थापना
हॉटेल-लॉजिंग बोर्डिंग १२५
रेस्टॉरंट ७५०
मॉल्स ४
यात्री निवास २००
किराणा, धान्य दुकाने ७०००
वैद्यकीय किरकोळ दुकाने ४५०
शासनाने हे विधेयक आणून उत्तम निर्णय घेतला आहे. सध्या दळण-वळणाची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यात कोल्हापूरच्या पर्यटनवाढीस या निर्णयामुळे हातभार लागणार आहे. यासह सुरक्षितता महत्त्वाची आहे. सुरक्षिततेचे उपाय व पोलिसांनी नियमित गस्त ठेवल्यास हा उत्तम निर्णय ठरेल.
- बाळ पाटणकर,
हॉटेल व्यावसायिक
निर्णयाचा फायदा पर्यटनवाढीस होईल. त्याचबरोबर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची आहे. लॉजिंगला २४ तास परवानगी नव्हती. मात्र, या निर्णयामुळे ती मिळेल.
- सिद्धार्थ लाटकर, सचिव, कोल्हापूर हॉटेल मालक संघ,
शासनाने या विधेयकास संपूर्ण मंजुरी दिल्यास शहरातील वर्दळही वाढेल. त्याचा फायदा रिक्षाचालकांच्या व्यवसायास हातभार लागण्यास होईल. रात्री साडेअकरानंतर शहरात बहुतांश रेस्टॉरंटमध्ये बाहेरून आलेल्या पर्यटकांना जेवण मिळत नाही. या निर्णयामुळे पर्यटकांची वर्दळ वाढेल.
- चंद्रकांत भोसले, रिक्षा व्यावसायिक, कोल्हापूर
पर्यटनवाढीच्या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार करता, अंबाबाईचे मंदिर रात्री दहा वाजता बंद होते. त्यासह महिला कर्मचाºयांचाही प्रश्न मोठा आहे. रेल्वेगाड्यांचा राबताही मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही. सण, उत्सव काळातच हा निर्णय योग्य ठरू शकतो. - सीमा भोसले,
हॉटेल व्यावसायिक,
कोल्हापूर