Kolhapur: खंडणीप्रकरणात सागर चौगुलेचे नाव, पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:52 PM2024-10-15T12:52:17+5:302024-10-15T12:53:20+5:30
आणखी काही तोतया पत्रकारांची नावे समोर येणार
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक विक्रेत्याला धमकावून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीत शहरातील एका वृत्तवाहिनीत काम करणारा सागर यशवंतराव चौगुले (वय ४२, रा. कळंबा, ता. करवीर) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही तोतया पत्रकारांचा समावेश असल्याचे दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली.
तोतया पत्रकार अन्सार मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी लक्ष्मीपुरीतील प्लास्टिक विक्रेत्यास कारवाईची भीती घालून तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर कथित सामाजिक कार्यकर्ता अजित पवार या काही साथीदारांसह खंडणी उकळण्यासाठी संबंधित विक्रेत्याकडे गेला होता. त्यावेळी सागर चौगुले हा दोन कॅमेरामन घेऊन दुकानासमोर गेला. पैसे दिले नाहीत तर न्यूज चॅनेलवर बातमी लागणार, असे त्याने धमकावले. आर्थिक व्यवहारात मध्यस्थी केली, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चौगुले याच्यावर गुन्हा दाखल केला. तो मोबाइल बंद करून पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी एक पथक पाठवल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. तोतया पत्रकार अन्सार मुल्ला हा मात्र अजूनही पोलिसांना सापडलेला नाही.
चौगुलेचे अनेक कारनामे
सागर चौगुले याने यापूर्वीही काही लोकांकडून पैसे उकळल्याची चर्चा सुरू आहे. कळंबा येथील एका व्यावसायिकाला बेकायदेशीर बांधकाम आणि उत्खनन केल्याची भीती घालून त्याने पाच लाख रुपये घेतल्याची चर्चा सुरू आहे. याचीही माहिती घेतली जात असून, संबंधितांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन लक्ष्मीपुरी पोलिसांनी केले आहे.