हनीट्रॅप प्रकरणातील सागर माने गँगला मोका; मोठ्या व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढून घालायचे गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 11:47 AM2021-12-25T11:47:37+5:302021-12-25T12:05:30+5:30
विधी संघर्षीत मुलीस सोशल मीडियावर संपर्क करण्यास सांगून शहरातील सराफ व्यावसायिक व व्यापाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांना लुटले.
कोल्हापूर : विधी संघर्षीत मुलीस सोशल मीडियावर संपर्क करण्यास सांगून शहरातील सराफ व्यावसायिक व व्यापाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांना लुटणाऱ्या सागर माने (एस.एम) गँगवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. जुना राजवाडा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली. याप्रकरणी चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून अन्य दोघे फरार आहेत. एक विधीसंघर्षित बालिका आहे.
मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा मुख्य सूत्रधार सागर पांडुरंग माने (रा. कळंबा), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे, आकाश मारुती माळी (दोघेही रा. यादवनगर), लुकमान शकील सोलापुरे (सरनाईक वसाहत, जवाहरनगर), सौरभ गणेश चांदणे (म्हाडा काॅलनी, यादवनगर), विजय रामंचद्र गौड (रा. कळंबा), व विधी संघर्षित बालिका यांचा या टोळीत समावेश आहे.
या प्रकरणातील फिर्यादीला विधी संघर्षित बालिकेने सोशल मीडियावरून संपर्क साधून भेटण्यास बोलावले. तेथील हॉटेलमध्ये गेल्यानंतर बालिका हॉटेलच्या वॉशरूममधून बाहेर आली. या दरम्यान तिच्या साथीदारांनी त्या ठिकाणी येऊन मोबाईलवरून चित्रीकरण केले. अत्याचार केल्याची फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याची व बदनामी करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळले. असाच प्रकार या संशयितांनी तीन ते चार जणांबाबतही केला होता.
याबाबत तपास करून पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे व अरविंद कांबळे यांच्या पथकाने संशयित आरोपींनी एकूण २८ गुन्हे केले आहेत. हे सर्व संघटितपणे केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठविला. तो त्यांनी पुढे विशेष महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला. त्यांनी त्याला शुक्रवारी मंजुरी दिली.
यातील संशयित साळुंखे,वाटंगी, सोलापूरे, चांदणे हे चारजण लाईन बझार येथे मिळून आले. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांकडे सुपूर्द केले.