‘फुले जनआरोग्य’चे सागर पाटील यांची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:12 PM2018-10-31T13:12:13+5:302018-10-31T13:14:20+5:30
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांची मंगळवारी सातारा येथे तडकाफडकी बदली झाली. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातून योजनेतील रुग्णालयांवर जे छापे टाकण्यात आले, या पार्श्वभूमीवर पाटील यांची बदली झाल्यामुळे चर्चेला ऊत आला आहे.
कोल्हापूर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांची मंगळवारी सातारा येथे तडकाफडकी बदली झाली. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातून योजनेतील रुग्णालयांवर जे छापे टाकण्यात आले, या पार्श्वभूमीवर पाटील यांची बदली झाल्यामुळे चर्चेला ऊत आला आहे.
डॉ. पाटील यांच्या बदलीमुळे सध्या सहायक जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत वस्तूस्थिती समजून घेण्यासाठी डॉ. पाटील यांच्याशी मोबाईलवर अनेकदा संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील ३२ रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालये अतिरिक्त पैसे घेतात, जास्त दिवस रुग्णालयात उपचारांसाठी ठेवतात, आदी तक्रारी या योजनेचे राज्याचे मुख्य समन्वयक डॉ. सुधाकर शिंदे यांना आॅनलाईन प्राप्त झाल्या होत्या.
याची दखल घेऊन त्यांनी जिल्ह्यातील योजनेत समाविष्ट सर्व रुग्णालयांवर छापे टाकले. या कारवाईत चार रुग्णालयांना योजनेतून काढून टाकण्यात आले; तर दहाजणांना तात्पुरते निलंबित केले आहे. त्यानंतर पुढे ही कारवाई सुरू राहिली; पण पुढे किती रुग्णांलयावर कारवाई केली, हे गुलदस्त्यात राहिले.
या योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. पाटील यांची सातारा येथे बदली झाली असल्याची चर्चा आहे; तर ‘सीपीआर’मधील योजनेच्या कार्यालयामधून त्यांना १५ दिवसांसाठी सातारा येथे पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. एप्रिल २०१७ ला त्यांची सांगली येथून कोल्हापूरला बदली झाली होती. गेले दीड वर्र्ष ते जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहत होते.
सातारा चार महिन्यांपासून रिक्त
सातारा येथे यापूर्वी योजनेचे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ. इंद्रजित पाटील हे काम पाहत होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे गेले चार महिने जिल्हा समन्वयक पद रिक्त होते. येथील पद रिक्त राहिल्याने डॉ. सागर पाटील यांची या ठिकाणी नेमणूक झाली असल्याचे सांगण्यात आले.