सागरोबा देवाच्या दर्शनासाठी गर्दी, सागरमाळ येथे म्हशीचा ‘फॅशन शो’
By admin | Published: November 2, 2016 12:52 AM2016-11-02T00:52:59+5:302016-11-02T00:52:59+5:30
नागरिकांनी मोठी गर्दी केली
कोल्हापूर : म्हशींच्या गळ््यात माळा, पायात चांदीचे पैंजण, शिंगांमध्ये मोरपिसारा, पाठीच्या केसांवर कोरीव काम करून सजविलेल्या म्हशी, मालकांच्या हाकेसरशी आणि मोटारसायकलच्या आवाजावर मागे धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी सागरमाळ येथे मंगळवारी सायंकाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली, निमित्त होते भाऊबिजेनिमित्त सागरोबा देवाच्या दर्शनाचे.
भाऊबिजेदिवशी सम्राटनगर येथील सागरमाळ येथील सागरोबा देवाच्या दर्शनासाठी म्हशीसोबत नेत देवाला अभिषेक घालण्याची जुनी परंपरा आहे. दर्शन घेतल्यानंतर वर्षभर म्हशी विविध स्पर्धेत सहभाग होतात, अशी खूप जुनी पद्धत आहे. ही परंपरा जपण्यासाठी मंगळवारी मालकांची पावले सागरमाळाकडे वळू लागली. दुपारी साडेतीननंतर अनेक मालक आपल्या म्हशीसोबत ठेवणीतील कपडे घालून, खांद्यावर लाल रूमाल, हातात काठी घेऊन हलगीच्या कडकडात वाजत-गाजत या ठिकाणी सहभागी होत होते. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, गंगावेश, जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, गवळ गल्ली, दौलतनगर, मोरेवाडी, पाचगांव, कंदलगाव, कळंबा आदी परिसरातून दूध व्यावसायिक आपल्या सजविलेल्या म्हशीसह या ठिकाणी येत होते. दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी नंतर म्हशीचा अनोखा ‘फॅशन शो’ रंगला. या ठिकाणी मालकाच्या मोटारसायकल आवाजाच्या इशाऱ्यावर वमालकाच्या एका हाकेवर धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी काहीजणांनी मागील दोन पायांवर उभा राहणाऱ्या म्हशीच्या अनोख्या कसरती करून दाखवून उपस्थितांना अचंबित केले, तर काही लहान मुले आपल्या म्हशीच्या पाठीवर उभे राहून नाचत होती.
कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुग्ध व्यवसाय संघटनेच्यावतीने प्रत्येक म्हैसमालकांचा पान-विडा, टोपी व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांनी याठिकाणी भेट दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास केसरकर, उपाध्यक्ष संजय करंबे, पिंटू भोसले, युवराज बचाटे, विजय चौगले, राजू करंबे, हरिभाऊ पायमल, गोगा पसारे, सुनील आडगुळे यांच्यासह ग्रामीण भागासह शहरातील दूध व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)