गुराख्यांनी ऐकला होता ‘वाचवा-वाचवा’चा टाहो!

By admin | Published: November 21, 2014 11:42 PM2014-11-21T23:42:59+5:302014-11-22T00:08:24+5:30

मांढरदेव खूनप्रकरण : सीसीटीव्हीचे फुटेज, रिक्षाचालक ठरणार तपासातील महत्त्वाचे दुवे

The sages had heard 'save-save' tahaha! | गुराख्यांनी ऐकला होता ‘वाचवा-वाचवा’चा टाहो!

गुराख्यांनी ऐकला होता ‘वाचवा-वाचवा’चा टाहो!

Next

वाई/मांढरदेव : मांढरदेव गडावर अल्पवयीन मुलीच्या किंकाळ्या घुमल्या आणि नरबळीच्या शंकेने जिल्हा हादरला. तसा काही प्रकार नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असले, तरी खुनाच्या कारणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ‘वाचवा-वाचवा’ असा टाहो ऐकणारे गुराखी, संबंधित मुलीला संशयिताच्या सोबत गडावर सोडणारा रिक्षाचालक आणि ‘सीसीटीव्ही’चे फुटेज हेच तपासातील महत्त्वाचे दुवे ठरणार आहेत.
तपासाची चक्रे गतीने फिरवून पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला इंदापूर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाई तालुक्यातील सुरूरजवळ असणाऱ्या धावजी पाटील वस्तीतील आठवीत शिकणाऱ्या एका मुलीला चाळीस वर्षे वयाचा संशयित खंडाळा येथे घेऊन गेला होता. तेथील एका दुकानात त्याने तिच्यासाठी कपडे खरेदी केले आणि तो तिला घेऊन वाई येथे आला. दुपारी एकच्या सुमारास मुलीला घेऊन रिक्षाने तो मांढरगडावर गेला.
गडावरील काळूबाई मंदिरापासून काही अंतरावरील दाट झाडीत दोघांना जाताना काही लोकांनी पाहिले होते. त्यानंतर ‘वाचवा-वाचवा’ असा मुलीचा ओरडण्याचा आवाज काही गुराख्यांनी ऐकला होता, असे सांगितले जाते. याच ठिकाणी कपडे खरेदी केलेली पिशवी, पाण्याची बाटली आणि एका पायातील पैंजण पोलिसांना आढळून आले आहे.
या ठिकाणापासून मुलगी काही अंतर पळत गेली असावी, असे दिसून आले असून, त्यानंतर धारदार हत्याराने गळा चिरून तिचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाकडी (भवानीनगर, ता. इंदापूर) येथून एका चाळीस वर्षे वयाच्या संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, वाई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, निरीक्षक गलांडे, सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक अनंत चिंचकर, विकास जाधव आणि कर्मचारी या प्रकरणाचा कसून तपास करीत असून, लवकरच गुन्ह्यामागील कारणांचा छडा लागेल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी/वार्ताहर)


तातडीने हालचाली
वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गलांडे घटनास्थळी तातडीने पोहोचले होते. काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे या उच्चपदस्थांनी घटनास्थळाला भेट दिली. तेथे सापडलेले धागेदोरे तपासून त्यावरून सातारा आणि वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके आरोपीला शोधण्यासाठी रवाना करण्यात आली.


‘मिसिंग’ची तक्रार
संबंधित मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार भुर्इंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीतील मुलीचे वर्णन आणि मांढरदेव येथे खून झालेल्या मुलीच्या वर्णनात साधर्म्य आढळल्याने निरीक्षक गलांडे यांना संशय आला आणि त्यातूनच मुलीची ओळख पटली.

‘फुटेज’ची बारकाईने पाहणी
मांढरदेव येथील काळूबाई मंदिराच्या परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संबंधित मुलगी आणि तिच्यासमवेत असणारा संशयित या कॅमेऱ्यांच्या ‘फुटेज’मध्ये दिसण्याच्या शक्यता असून, हाच सर्वाधिक महत्त्वाचा धागा ठरणार आहे. त्यामुळे या ‘फुटेज’ची बारकाईने पाहणी करण्यात येत आहे.

Web Title: The sages had heard 'save-save' tahaha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.